
आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिप
अल ऐन, संयुक्त अरब अमिराती ः आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया फेरीत भारतीय बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवत आगेकूच केली.
टॉप बोर्डवर तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर ए आर इलामपार्थीने इराणच्या उच्च दर्जाच्या ग्रँडमास्टर तबताबाईवर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या बोर्डवर माजी राष्ट्रीय विजेता मुरली कार्तिकेयन याने चीनच्या लू यिपिंगवर सहज मात केली.
ग्रँडमास्टर पी इनियन, एम प्रणेश आणि प्रणिथ वुप्पला यांनी अनुक्रमे वांग शिक्सू (चीन), काँग झियांगरुई (चीन) आणि ग्रिगोरी फेडोरोव्ह (रशिया) यांचा पराभव केला. वरील सर्व भारतीय प्रत्येकी २ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
तथापि, राष्ट्रीय विजेता कार्तिक वेंकटरमन याला इराणच्या आयएम महदवी रेझा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या फेरीचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला विभागात वंतिका अग्रवाल, प्रियांका नुटक्की, श्रीजा शेषाद्री आणि रक्षिता रवी रशियाच्या अव्वल मानांकित व्हॅलेंटिना गुनिनासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. या खेळाडूंनी प्रत्येकी दोन गुण संपादन केले आहेत. राष्ट्रीय चॅम्पियन पीव्ही नंदीधा, निशा मोहोता आणि मेरी ॲन गोम्स प्रत्येकी १.५ गुणांवर आहेत.