
मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळ २०२५-२०२७ या कालावधीतील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतात आयोजित करण्याचा विचार करत आहे.
या संदर्भातील प्रस्ताव नंतर औपचारिकरित्या तयार केला जाईल. यापूर्वी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना २०२१ मध्ये साउथहॅम्प्टन येथे आणि दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना २०२३ मध्ये ओव्हल येथे खेळवण्यात आला होता. त्याच वेळी, २०२५ मध्ये म्हणजेच या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पुढील महिन्यात लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये झालेल्या आयसीसी मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती जिथे बीसीसीआयचे प्रतिनिधित्व आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी केले होते. डिसेंबर २०२४ मध्ये ग्रेग बार्कले यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे सध्याचे आयसीसी अध्यक्ष आहेत.
एका सूत्राने सांगितले की, ‘जर भारत पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचला तर चाहत्यांसाठी तो एक उत्तम प्रसंग असेल. पण जरी भारत अंतिम फेरीत खेळला नाही तरी अनेकांना इतर दोन अव्वल संघांमधील सामन्यात रस असेल. भारताने आतापर्यंत दोनदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०२१ मध्ये न्यूझीलंडने आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
भारतीय संघ या आवृत्तीच्या म्हणजेच २०२५ च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. भारताचा नियमित कसोटी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया नवीन कर्णधारासह कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन हंगामात प्रवेश करेल. शुभमन गिल सध्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
भारतीय संघ २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरुवात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेने करेल. पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीड्समध्ये खेळला जाईल. भारताने शेवटचा २०२१-२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. मात्र, कोरोनामुळे पाचवी कसोटी उशिरा खेळवण्यात आली आणि बुमराहने त्यावेळी कर्णधारपद भूषवले होते आणि मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती.