
राजगीर (बिहार) : टेबल टेनिसमध्ये अव्वल मानांकित खेळाडूंवर मात करीत महाराष्ट्राच्या काव्या भटने सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्ण पदकाचे शिखर सर केले. तामिळनाडूच्या एम हंसिनीला ४-१ गेमने पराभूत करून स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्ण पदक जिंकण्याचा करिश्मा काव्याने घडविला.
राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या हॉलमध्ये संपलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णासह कांस्य पदकाची कमाई महाराष्ट्राने केली. मुलींच्या एकेरीत दिव्याश्री भौमिकने कांस्य पदकाची कमाई केली. काव्या व दिव्याश्री हे स्पर्धेतील दुसरे पदक आहे. या जोडीने दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

एकेरीच्या अंतिम लढतीत काव्याने अव्वल मानांकित तामिळनाडूच्या एम हंसिनीला १२-१४, ११-८,११-८, ११-९, ११-१ गेमने पराभूत केले. पहिला गेम गमविल्यानंतरही आत्मविश्वासने खेळी करीत काव्याने बाजी मारली. डावखुऱ्या काव्याने दबावाखाली न घेता संयमी खेळ करीत सलग चार गेममध्ये वर्चस्व गाजवले. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये हंसिनीने काव्याने झुंजवले. जोरदार स्मॅशेसच्या जोरावर आघाडी घेत पाचव्या गेमही सहजपणे जिंकला. चेन्नई येथील खेलो इंडियात काव्या सराव करते असते. गेल्या ३ राष्ट्रीय स्पर्धेत हंसिनीकडून काव्या पराभूत झाली होती. प्रथमच हंसिनीला हरवून खेलो इंडिया पदक जिंकण्याचा आनंद मोठा असल्यावे काव्याने सांगितले.
मुलींच्या कांस्य पदकाच्या लढतीत दिव्याश्री भौमिकने महाराष्ट्राच्याच सुकृती शर्माचा १२-१०, ११-४, ११-६ गेमने पराभव केला. काव्या व दिव्याश्रीने पदापर्णातच २ पदक जिंकली आहेत.