
नवी दिल्ली : पार्थ माने याने नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला आणखी एक पदक जिंकून दिले.
नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मराठमोळ्या पार्थ माने याने पात्रता फेरीत ६३२.९ गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, कर्नाटकच्या नरिन प्रणवने अंतिम फेरीच्या एलिमिनेटर राऊंडमध्ये मोक्याच्या वेळी अचूक कामगिरी करत २५२.९ गुणांसह सुवर्णवेध साधला.
पार्थ मानेला २५१.९ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत अखेरच्या आठव्या स्थानी राहिलेला हरयाणाचा प्रणव जिंदाल २२८.२ गुणांसह कांस्यपदकांचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या पार्थ माने याने शांभवी क्षीरसागरच्या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. होती. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे दुसरे पदक ठरले. गत तामिळनाडू स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. पनवेलमध्ये सुमा शिरूर यांच्या लक्ष्य ॲकॅडमीत तर कसून सराव करीत असतो.