रिक्षा चालकाच्‍या मुलीचा राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पराक्रम

  • By admin
  • May 11, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

वेटलिफ्टिंगमध्ये कराडच्‍या अस्‍मिता ढोणेने पटकावले सुवर्णपदक

राजगीर (बिहार) : कराडमध्ये रिक्षा चालक असणाऱ्या दत्तात्रय ढोणे यांच्या मुलीने सातव्‍या खेलो इंडिया युवा स्‍पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. १७० किलोची विक्रमी कामगिरीची नोंद करून महाराष्ट्राच्‍या अस्‍मिता ढोणेने ४९ किलो गटात सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. यवतमाळच्‍या पूजा ढेपेकरने कांस्यपदक जिंकले.

राजगीर क्रीडा विद्यापीठाचा परिसरात सुरू असलेल्‍या वेटलिफ्टिंगच्‍या संध्याकाळच्‍या सत्रात पुन्‍हा एकदा महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. स्‍नॅच प्रकारात ७३ किलो वजन उचलून अस्‍मिता दुसऱ्या स्‍थानावर गेली होती. क्लिन अँन्‍ड जर्क प्रकारात ९४ व ९७ किलो असे दोन विक्रम तीने नोंदविले. पाठोपाठ एकूण कामगिरीतही १६३ व १७० किलो वजनाची नोंद करून तिने आजचा दिवस गाजविला.

१८ वर्षीय अस्‍मिता ढोणे ही कराडच्‍या जय हनुमान व्‍यायाम शाळेत सम्राट पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सराव करते. गत स्‍पर्धेत तिला रौप्‍यपदकावर समाधान मानावे लागले होते. आजचे यश अपेक्षित होते, आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले आहे. मी आंतरराष्ट्रीय स्‍पर्धेत पदक जिंकावे असे वडिलांचे स्‍वप्‍न आहे. यासाठी हे खेलो इंडियाचे पदक प्रोत्‍साहन देणारे आहे.

यवतमाळच्‍या पूजा ढेपेकरने १३२ किलो वजनाची कामगिरी करीत कांस्य पदकाची कमाई केली. खेलो इंडिया स्‍पर्धेत पर्दापणातच तीने पदक जिंकले आहे. १६३ किलो कामगिरीसह उत्तर प्रदेशच्‍या मानसी चामुंडा हिला रौप्‍यपदक मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *