
रेल्वेची ७८वी स्कॉट मेमोरियल प्रीसिजन क्रिकेट स्पर्धा : यश बोरामणी सामनावीर, प्रवीण देशेट्टी मालिकावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट संघाने सलग तिसऱ्यांदा रेल्वेच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेतील अ गटाचे विजेतेपद पटकावत विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली.
रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात यश बोरामणीच्या अष्टपैलू खेळामुळे मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटने मॉडेल क्रिकेट अकादमीवर ६४ धावांनी मात केली. यशने तडफदार अर्धशतक व तीन बळी टिपले. तो सामन्याचा मानकरी ठरला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात आले. अंतिम सामन्यासाठी दयानंद नवले व नितीन गायकवाड यांनी पंच तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखकाचे काम पाहिले.
अंतिम सामन्यानंतर अ गट व ब गटातील विजेत्या व उपविजेत्या संघाला रेल्वेचे क्रीडा अधिकारी आदित्य त्रिपाठी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी रेल्वेचे अधिकारी सचिन गणेर, अभिषेक चौधरी, परिजनचे विनायक दूधगी, रणजीपटू नितीन देशमुख, रोहित जाधव, मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी किशोर पिल्ले, खजिनदार विक्रांत पवार, कमिटी मेंबर मनोज वाल्मिकी, विक्रम माने उपस्थित होते.
या स्पर्धेला वैयक्तिक पारितोषिक देऊन सहकार्य केल्याबद्दल सुदेश मालप, राजा पटेल, वासुदेव दोरनाल, वैभव इराबत्ती, प्रवीण देशेट्टी व अतुल बांडीवाडीकर तसेच सर्व खेळाडूंना ग्लुकॉन डी दिल्याबद्दल रोहित भैय्या यांचा तसेच स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी रेल्वे मैदानावर काम करणारे पंडित गायकवाड, सुमित भेंडे, कोळी, सुनील गादे, बिराप्पा बंडगर व सचिन गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा पटेल यांनी केले.
तत्पूर्वी, या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उद्घाटन उद्योजक मनोज भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ क्रिकेट खेळाडू के. टी. पवार, गोविंद दाडे, रेल्वेचे वरिष्ठ खेळाडू लियाकत शेख, वासुदेव दोरनाल, मारुती जानगवळी, वैभव इराबत्ती, प्रवीण देशेट्टी, मुकुंद श्रेष्ठ उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर : ४० षटकात ८ बाद २६६ (प्रवीण देशेट्टी ६७, यश बोरामणी ५६, पृथ्वीराज मिसाळ ३५, मोहनिष येमूल २८, संकेत काखंडकी व जय पांढरे प्रत्येकी २ बळी, यश खळदकर व अक्षय हावळे प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकॅडमी : ३६.५ षटकात सर्वबाद २०२ (आदर्श नागोजी नाबाद ५५, सुधन्व मनुर ३७, संदीप राठोड २६, यश बोरामणी ३ बळी, अमन सय्यद २ बळी, आदित्य दडे, अझहर अलगुर, आशिष अवळे व वेदांत काळे प्रत्येकी १ बळी).
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
ब गट : मालिकावीर : रोशन पत्रे (परेल वर्कशॉप), फलंदाज : मिर्झा वासिम बेग (ख्वाजा बंदे नवाज क्रिकेट अकादमी). गोलंदाज : रोशन पत्रे (परेल वर्कशॉप).
अ गट : मालिकावीर व फलंदाज : प्रवीण देशेट्टी (मध्य रेल्वे). गोलंदाज : मयूर राठोड (पुष्प जिमखाना).