
खेलो इंडिया बीच गेम्स
नागपूर ः दमण आणि दीव येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ मध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सेपक टकरा संघात नागपूरच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
नागपूर शहरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, १९ ते २४ मे दरम्यान दमण आणि दीव येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ मध्ये टीम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशनकडून चार प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात मोहम्मद सोहेल, इर्शाद सागर, मोहम्मद अली (सर्व अंजुमा हमी-ए-इस्लाम अकादमी) आणि समीर थूल (सेंट पॉल अकादमी) या खेळाडूंचा समावेश आहे.
हे चारही गुणवान खेळाडू अलिबाग येथील वरसोली बीच येथे ५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील. या शिबिरात त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर हा संघ १७ मे रोजी दमण आणि दीव येथे प्रतिष्ठित खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होईल.
एनडीएसटीए अध्यक्ष विपिन कामदार, एनडीएसटीए सचिव डॉ योगेंद्र पांडे, एनडीएसटीए कोषाध्यक्ष जावेद राणा, डॉ देवेंद्र वानखेडे, अनीस रझा, डॉ अमृता पांडे, डॉ अमित कंवर यांनी महाराष्ट्र संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.