
बीडच्या वेदांतची चमकदार कामगिरी
बीड ः भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभाग अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर प्रतिवर्षी होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या पाच खेळाडूंची राज्य संघात निवड झाली होती. खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय स्पर्धेत रग्बी खेळाचा समावेश यावर्षी प्रथमच झाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्यपदकाची कमाई केली. यात बीडच्या वेदांत डावकर याची कामगिरी लक्षवेधक ठरली.
पाटणा (बिहार) येथे रग्बी स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र संघात बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू वेदांत गोरख डावकर, आदिती सखाराम लोंढे, कीर्ती किरण जाधव, दीपाली दिलीप ताटे, समीक्षा अरुण ताटे या पाच खेळाडूंची निवड झाली होती.
महाराष्ट्र मुलांच्या संघाने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. या संघात बीडच्या वेदांत गोरख डावकर याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेत तृतीय येणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला ५० हजार रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच मुलींच्या संघाला कांस्य पदक सामन्यात अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. मुलींच्या संघाला चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले.
मोरया क्रीडा मंडळाच्या मैदानावर हे खेळाडू वर्षभर सराव करतात. मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक, बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे, कारागृह पोलिस व रग्बी प्रशिक्षक शोएब खाटीक आणि अशोक चौरे (सचिव, मोरया क्रीडा मंडळ) यांनी खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात होण्याकरिता सर्व खेळाडूंचा कसून सराव करून घेतला.
महाराष्ट्रातील खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव नासेर, सहसचिव संदीप मोसमकर, मीनल पास्ताला, ईश्वर कोटारकी, प्रशिक्षक म्हणून प्रणव पाटील आणि उज्वला घुगे आणि बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे, कारागृह पोलिस तसेच प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, साईनाथ राजे, भगवानराव बागलाने, यश जाधव, शिवराज देवगुडे, सतीश तकिक, अदनान शेख, सूरज येडे, ईश्वर कानडे, ओंकार मोरे, आकाश खांडे, संदीप वडमारे, संभाजी गिरे, विशाल ढास इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी अभिनंदन केले आहे.