
छत्रपती संभाजीनगर ः ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू मोहसीन अहमद यांची दुसऱ्या वेळी महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना ही महाराष्ट्राची अत्यंत जुनी संघटना असून याची नवीन कार्यकारिणी नुकतेच मुंबई येथे संघटनेच्या कार्यालयात आठ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू राष्ट्रीय पंच व छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वप्रथम युवा पिढीत शरीरसौष्ठवची जाणीव करून देणारे मोहसीन अहमद यांची पुन्हा संघटनेचे कार्याध्यक्षपदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचे खान मोहम्मद यासर यांची राज्य उपाध्यक्ष व शेख नोमान अहमद यांची नियुक्ती राज्य मीडिया हेड या पदावर करण्यात आली आहे. लवकरच संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मोहसीन अहमद, खान मोहम्मद यासर व शेख नोमान अहमद यांच्या नियुक्तीबद्दल शरीरसौष्ठव संघटना, शरीरसौष्ठवपटू आणि मित्रपरिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.