
गुणवान खेळाडूंवर अन्याय, निकषात न बसणाऱया खेळाडूला खेळवले
ए. बी. संगवे
सोलापूर ः महाराष्ट्र शासनाच्या शालेय १९ वर्षांखालील खो-खो संघात निवड करताना २०२४-२५ या वर्षात वशिलेबाजी झाली असल्यामुळे पुणे विभागातून विजेतेपद मिळवलेल्या व राज्य स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळांमधील गुणवान खेळाडूंवर अन्याय झाला आहे.
जो खेळाडू महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या १८ वर्षांखालील संघातही निवडला जात नाही. तो खेळाडू कोणत्याही निकषात बसत नसताना पुणे विभागाच्या क्रीडा उपसंचालकांच्या शिफारशीने महाराष्ट्र शासनाच्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळला. क्रीडा उपसंचालक व निवड समितीच्या संगनमताने तो निवडलेला खेळाडू नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाच्या महाराष्ट्र संघात देखील खेळला. तो निवडलेला खेळाडू आहे पुण्याचा नरेश चांदणे.
पुणे विभागातून गेल्या तीन वर्षांपासून १९ वर्षाखालील गटात सोलापूर जिल्ह्याचे वर्चस्व आहे. महाराष्ट्राच्या या संघात पुणे विभागातून विजेतेपद मिळवलेल्या व राज्य शालेय स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळांतील खेळाडूची निवड होत नाही. परंतु पुणे विभागातून पराभूत झालेल्या शाळेतील खेळाडूंची निवड होते. क्रीडा उपसंचालक आणि निवड समितीच्या संगनमताने अशा खेळाडूंची निवड होत असल्याचा आरोप संबंधित शाळातील क्रीडा शिक्षकांचा आहे. खेलो इंडियाला तर मोठ्या रकमेची बक्षिसे असल्याने यातही असेच चालत आहे.
पुण्याचा नरेश चांदणे नियमबाह्य डायरेक्ट चाचणीत
सोलापूर येथे २०२४-२५ मध्ये झालेल्या विभागीय खो-खो निवड चाचणीतून पराभूत झालेल्या संघातून व निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूंमधून पाच खेळाडू निवडले होते. यात नरेश चांदणेचे नाव नव्हते. जर राज्याला डायरेक्ट चाचणीसाठी खेळाडू पाठवायचा असेल तर तो खेळाडू त्याच गटातून गतवर्षी शालेय राष्ट्रीय किंवा संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला प्राविण्य प्राप्त खेळाडू असावा. तसेच तो शालेय प्राथमिक स्तरावर सहभागी असला पाहिजे. परंतु तो जिल्हा व विभागस्तर निवड चाचणीत सहभागी झाला असेल आणि त्याची विभागातून निवड चाचणीतून निवड न झाल्यास त्यालाही थेट राज्य चाचणीसाठी पाठवता येत नाही. या निकषात न बसलेला नरेश चांदणेला क्रीडा उपसंचालकांनी बुलढाणा येथे झालेल्या राज्य निवड चाचणीस डायरेक्ट पाठवले आणि तो राष्ट्रीय स्पर्धा आणि नुकतीच झालेली खेलो इंडिया स्पर्धाही खेळला.
क्रीडामंत्री व क्रीडा आयुक्त यात लक्ष घालतील का?
पुणे विभागातून राज्य चाचणीसाठी पाठविलेले पाचही खेळाडू गतवर्षी शालेय व संघटनेच्या स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्णपदक प्राप्त होते. त्यातील फक्त कृष्णा बनसोडे वगळता उर्वरित चार खेळाडूवर अन्याय झाला. त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्या अगोदर नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक पटकावले होते. असे होऊनही नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया निवड चाचणीसाठीही नरेश चांदणे निवडला गेला. त्यामुळे अन्य एका गुणवान खेळाडूवर अन्याय झाला. असे किती नरेश चांदणे सारखे खेळाडू वशिल्याने खेळले आहेत. याची राज्याचे क्रीडा आयुक्त व क्रीडामंत्री यांनी चौकशी करुन संबंधित क्रीडा उपसंचालक व निवड समितीवर कारवाई करावी. जेणेकरून यापुढे अशा नियमबाह्य घटनेस आळा बसेल, अशी मागणी राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेतील क्रीडा शिक्षकांनी केली आहे. यापुढे असाच संबंधित शाळातील खेळाडूंवर अन्याय होईल या हेतूने या शाळांतील क्रीडा शिक्षकांनी आपली नावे जाहीर करू नका, असे आमच्या प्रतिनिधीस कळविले आहे.
खेलो इंडियामध्ये सोलापूरच्या मुलींवर अन्याय
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. मुलींच्या निवड चाचणीतही भेदभाव व वशिलेबाजी झाली असल्याचा क्रीडा शिक्षकांचा आरोप आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते प्राजक्ता बनसोडे, अश्विनी मांडवे, स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने व गौरी काशीद हे ५ खेळाडू चाचणीस गेले होते. यातील एकाचीही निवड झाली असती तर महाराष्ट्राच्या कामगिरीत नक्कीच फरक पडला असता, असा संबंधित क्रीडा शिक्षकांचा दावा आहे