
अंतिम फेरीत ठाणे संघावर २-१ ने विजय
वाशी, नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या महिला संघाने धमाकेदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबई संघाने ठाणेवर २-१ असा चुरशीचा विजय मिळवत राज्य अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.
पहिल्या एकेरी सामन्यात मुंबईच्या रिंकी कुमारीने आपल्या अचूक खेळाने ठाण्याच्या मधुरा देवळेला २५-८, २५-५ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत मुंबईला विजयी सुरुवात करून दिली. मात्र दुसऱ्या एकेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने जबरदस्त पुनरागमन करत मुंबईच्या मिताली पाठकला २५-५, २५-४ असा पराभव देत सामना बरोबरीत आणला.
निर्णायक दुहेरी सामना तितकाच रोमहर्षक ठरला. मुंबईच्या जोडीने हा सामना २४-१२, ५-१८, २०-१७ असा थरारक विजय मिळवत जेतेपद निश्चित केले. हा सामना अंतिम सेटपर्यंत गेलेला असल्याने प्रेक्षकांनाही खिळवून ठेवणारा क्षण अनुभवता आला.
तिसऱ्या क्रमांकासाठी पालघर, पुणे आणि रत्नागिरी या संघांचे प्रत्येकी दोन गुण झाले होते. मात्र सरासरी गुणफळकाच्या आधारे पालघर संघ तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्यात यशस्वी ठरला.
पुरुष एकेरीत वर्चस्व गाजवणारे खेळाडू
इक्बाल बागवान (कोल्हापूर) याने स्वप्नीलराजे शिंदे (रत्नागिरी) याला २२-६, २५-० असे पराभूत केले. फैझुल मोमीन (सांगली) याने प्रवीण मढवी (ठाणे) याला २४-९, २५-० असे हरवले. मेहराज शेख (नाशिक) याने दत्तप्रसाद शेंबकर (ठाणे) याचा १८-८, २५-१ असा पराभव केला. बिपीन पांडेय (पालघर) याने किरण बोबडे (ठाणे) याला २४-१९, २५-१ अशा फरकाने नमवले.
वयस्कर गटात संदेश अडसूळ (मुंबई) याने श्रीधर वाघमारे (रायगड) याला २२-१०, २५-१० असे पराभूत केले. बाळकृष्ण लोखरे (पुणे) याने विश्वनाथ शिवलकर (रत्नागिरी) याला २५-६, २०-७ अशा फरकाने नमवले. निरंजन चारी (पालघर) याने गणेश पाटणकर (मुंबई) याला २५-१२, २२-८ असे पराभूत केले. रघुनाथ वाघपंजे (मुंबई उपनगर) याने रवींद्र बच्चलवार (मुंबई) याला २५-५, २५-५ असे पराभूत केले.
मुंबई महिला संघातील सिमरन शिंदे, रिंकी कुमारी, नीलम घोडके, आयेशा खान, मिताली पाठक आणि वैभवी शेवाळे यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून संजय देसाई यांनी काम पाहिले.