
अंतिम फेरीत इशप्रीत सिंगशी लढत
मुंबई : स्नूकरचे बादशहा पंकज अडवाणी याने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत चौथ्या एनएससीआय बॉल्कलाइन अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्याने हिमांशू जैनवर ८-२ असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत त्याची गाठ गतवर्षीच्या उपविजेता इशप्रीत सिंग चढ्ढा याच्याशी पडणार आहे, म्हणजेच पुन्हा एकदा गतवर्षीची फायनल जिवंत झाली आहे.
एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बेस्ट ऑफ १५ फ्रेम्सच्या उपांत्य सामन्यात अडवाणीने शानदार खेळी केली. त्याने तिसऱ्या, सातव्या आणि नवव्या फ्रेममध्ये अनुक्रमे १२०, १३५ आणि ११२ अशा शतकी ब्रेकसह सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्याचे स्कोअर होते – ६९ (६९)-१५, ७३ (३१)-७१, १२१ (१२०)-०, ७४ (४९)-२६, २४-७१ (४९), ७२ (५०)-५, १३५ (१३५)-७, ३७-७० (३०), १३४ (११२)-२०, ६० (३५)-१८.
हिमांशू जैनला केवळ दोनच फ्रेम्स जिंकता आल्या, त्यात त्याचा सर्वोच्च ब्रेक ४९ गुणांचा होता. अडवाणीच्या अचूक स्ट्रोक्स आणि जबरदस्त ब्रेक बिल्डिंग समोर हिमांशू पूर्णपणे फिकट पडला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात इशप्रीत सिंग चढ्ढाने आदित्य मेहतावर ८-६ असा विजय मिळवत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. यामुळे यंदाच्या फायनलमध्ये पुन्हा अडवाणी विरुद्ध इशप्रीत अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.