
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर पहिल्या डावात अवघ्या १ धावेची आघाडी घेतली. त्यामुळे सोलापूर संघाने तीन गुण मिळवून ग्रुप मध्ये एकूण १८ गुण घेऊन प्रथम क्रमांक टिकवला आहे.

सोलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २०० धावा केल्या. कर्णधार विरांश वर्मा याचे शतक अवघ्या पाच धावाने हुकले. तो ९५ धावांवर बाद झाला. त्याला सार्थक कन्ना ४१ धावा व मयंक पात्रे याने ३४ धावा करून सुरेख साथ दिली.
छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सर्वबाद १९९ धावा केल्या. त्यामुळे सोलापूर संघास एक धावेची महत्त्वापूर्ण आघाडी मिळाली व त्यामुळेच सोलापूर संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर पराभव करून तीन गुण प्राप्त केले.
या सामन्यात मोहम्मद अली याने नाबाद ९५ धावा फटकावत सामना गाजवला. सोहम कुलकर्णी याने ५६ धावांत सात विकेट घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला. विरांश शर्मा याने दुसऱ्या डावात १०३ धावा फटकावत शतक साजरे केले. मयंक कदम याने ५५ धावांत चार बळी घेतले. मोहम्मद अली याने ६२ धावांत चार विकेट घेतल्या. अभिराम गोसावी याने दोन गडी बाद केले.
छत्रपती संभाजीनगर संघाचा दुसऱ्या डावात बिनबाद एक धाव अशी परिस्थिती असताना पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला. अशा रीतीने सोलापूर संघाला पहिल्या डावात मिळालेल्या एका धावेच्या आघाडीवर तीन गुण प्राप्त झाले.
सध्या गटामध्ये सोलापूर संघ एकूण १८ गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. आता १३ व १४ मे रोजी सोलापूर संघाचा साखळीतील शेवटचा सामना पुणे येथील एमसीव्हीएस संघाबरोबर होणार आहे.