
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः प्रेम भालेराव सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने पीसीए९९ अ संघावर ९४ धावांनी शानदार विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात प्रेम भालेराव याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २५ षटकात नऊ बाद २०१ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात पीसीए९९ अ संघाने २२.५ षटकात सर्वबाद १०७ धावा काढल्या. प्रदीप स्पोर्ट्स संघाने तब्बल ९४ धावांनी विजय साकारत आगेकूच केली.

या सामन्यात रुद्राक्ष कार्ले याने २४ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. प्रेम भालेराव याने ३६ चेंडूत ३४ धावा काढल्या. प्रेम याने चार चौकार मारले. आर्यन शिंदे याने १५ चेंडूत २६ धावांची वेगवान खेळी केली. आर्यनने दोन चौकार व दोन षटकार मारले.
गोलंदाजीत आदर्शराजे घोलप याने ४१ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. प्रेम भालेराव याने ९ धावांत दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. श्रेणिक काळे याने २१ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
प्रदीप स्पोर्ट्स ः २५ षटकात नऊ बाद २०१ (वरद सुलतान १७, रुद्राक्ष कार्ले ३९, साद शेख ११, सत्यजीत १३, प्रेम भालेराव ३४, आरव गुंजाळे १२, आर्यन शिंदे नाबाद २६, सुमेध कांबळे ११, इतर ३१, आदर्शराजे घोलप ४-४१, ओम रावले १-५३, सुदर्शन पाटील १-३५, रितेश घाडगे १-३१, मोहम्मद साद १-१६, देवव्रत पवार १-१४) विजयी विरुद्ध पीसीए९९ अ संघ ः २२.५ षटकात सर्वबाद १०७ (शौर्य वाघमारे २१, सर्वेश बालप ९ गायत्री झिरपे नाबाद १९, ओम रावले १६, इतर २८, पवन रोडे २-३०, प्रेम भालेराव २-९, श्रेणिक काळे २-२१, मयूर सोमासे १-२५). सामनावीर ः प्रेम भालेराव.