
आशियाई ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा
अल एन, यूएई ः आशियाई ब्लिट्झ ओपन व महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत मुरली कार्तिकेयन, नीलाश साहा आणि पद्मिनी राऊत या भारतीय बुद्धिबळपटूंना पदकाने हुलकावणी दिली.
आशियाई ब्लिट्झ ओपन आणि महिला अजिंक्यपद स्पर्धा १० मे रोजी अल एन, यूएई येथील दानत रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. आशियाई बुद्धिबळ महासंघाचे सरचिटणीस अल ताहिर हिशाम यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.

या प्रतिष्ठित स्पर्धेत २६ देशांतील एकूण १११ खेळाडूंनी भाग घेतला. रशियाच्या इव्हान झिमल्यान्स्कीने ८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. इराणच्या मोहावेद सिना याने ७.५ गुणांसह रौप्यपदक जिंकले. कांस्यपदकासाठी ४-वे बरोबरी झाली. रशियाच्या आयएम रुडिक मकारियान यांना उत्कृष्ट टायब्रेकच्या आधारे कांस्यपदक विजेता घोषित करण्यात आले. माजी भारतीय विजेता मुरली कार्तिकेयन, आयएम नीलाश साहा आणि जियांग हाओचेन (चीन) यांनी अनुक्रमे चौथे, पाचवे आणि सहावे स्थान पटकावले.
महिला विभागात १८ देशांमधून ८६ प्रवेशिका आल्या. वूमन ग्रँडमास्टर नुरमनअलुआ (कझाकस्तान) आणि ग्रँडमास्टर गुनिना व्हॅलेंटिना (रशिया) यांनी प्रत्येकी ७.५ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. नुरमनअलुआ यांना उत्कृष्ट टायब्रेकच्या आधारे सुवर्णपदक देण्यात आले. युक्सिन सॉन्ग (चीन), पद्मिनी राउत आणि कझाकस्तानच्या कालिखमेट एलनाज यांच्यात त्रि-मार्गी बरोबरी झाली. उत्कृष्ट टायब्रेकच्या आधारे युक्सिनला कांस्यपदक विजेती घोषित करण्यात आले. माजी भारतीय विजेती पद्मिनी राउत हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावी लागली. या संघाचे प्रशिक्षक प्रवीण ठिपसे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळत आहे.