
महाराष्ट्राला डझनभर पदकांची अपेक्षा
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आता उत्तरार्ध सुरू झालाय. अॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार सोमवारपासून (१२ मे) पाटणा शहरातील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धेलाही सोमवारपासुन सुरूवात होत असून दहा पेक्षा अधिक पदकांची अपेक्षा आहे.
ॲथलेटिक्समध्ये यंदा १७ मुली व ११ मुले असा एकूण महाराष्ट्राचा २८ खेळाडूंचा संघ मैदानावर आपले कौशल्य पणाला लावताना दिसेल. गतवर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत त महाराष्ट्राने ३८ खेळाडूंचा चमू मैदानावर उतरविला होता. त्यावेळी महाराष्ट्राने ५ सुवर्ण, ६ रौप्य व ७ कांस्य अशी एकूण १८ पदकांची लयलूट केली होती. यावेळीच्या संघात मुलांची संख्या कमी आहे. मात्र, तरीही महाराष्ट्राचे खेळाडू नक्की डझनभर पदके जिंकलीत अशी अपेक्षा आहे. शौर्या अंबोरे हिच्याकडून १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. याचबरोबर आदित्य पुजारी, रूद्र शिंदे, आदित्य पिसाळ, हर्षल जोगी, जान्हवी बिरुडकर, प्रणाली मंडले, अर्जून देशपांडे, सई चाफेकर असे अनेक अॅथलिट यावेळी पदकाचे दावेदार आहेत, अशी माहितीही सुहास व्हनमाने यांनी दिली.
खेलो इंडिया स्पर्धेत कुस्तीतही महाराष्ट्राची कामगिरी उंचावली आहे. गत तामिळनाडू स्पर्धेत ४ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १४ पदकांची लयलूट मराठमोळ्या कुस्तीगीरांनी केली होती. यंदाही मुले १९, मुली ७ असे एकूण २६ मल्लांचा संघ आखाड्यात उतरणार आहे. गत स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सोहम कुंभार, रौप्यपदक विजेता सोमराज मोरे रौप्य, कांस्य पदकाचा मानकरी ठरलेला आदित्य ताटे सलग दुसऱ्या पदकासाठी सज्ज झाले आहेत.