मराठा रॉयल्स संघाची सशक्त, संतुलित निवड

  • By admin
  • May 12, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

मुंबई लीग टी २० स्पर्धेसाठी तुषार देशपांडे आयकॉन खेळाडू 

मुंबई : खेळपट्टीवर नसूनही खेळी आखणारा माणूस असतो – याच वाक्याचा प्रत्यय टी २० मुंबई लीग २०२५ च्या लिलावात एमएससी मराठा रॉयल्सने सर्वाना दिला. संघाचा मुख्य मार्गदर्शक अभिषेक नायर यांनी प्रत्यक्ष मैदानात नसतानाही व्हर्च्युअल माध्यमातून संपूर्ण लिलावात कणखर भूमिका निभावत संघासाठी यशस्वी निवडी घडवून आणल्या. झूम आणि फोनवरून सातत्याने संपर्कात राहून त्यांनी संघ व्यवस्थापनासह रणनीती आखत संघाला एक नवा चेहरा दिला – तरुणाईचा जोश आणि अनुभवी खेळाडूंचा ठसा!

आठ संघांनी एकूण ७.७९ कोटी रुपये खर्च करत खेळाडूंची निवड केली असताना, एमएससी मराठा रॉयल्सने आपल्या पदार्पणासाठी १८ खेळाडूंचा सशक्त, संतुलित संघ उभारला. या संघात ५ विशेष गोलंदाज, ७ फलंदाज आणि ६ अष्टपैलूंचा समावेश असून, संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून अनुभवी तुषार देशपांडे (२० लाख) निवडले गेले आहेत.

मुख्य प्रशिक्षक अमित दाणी म्हणाले की, “अभिषेक नायर यांच्याइतका चांगला मार्गदर्शक आम्हाला मिळू शकला नसता. ते प्रत्येक निर्णयात आमच्या बरोबर होते. झूमवर, फोनवर. त्यांचं होमवर्क, त्यांचा अनुभव आणि त्यांची दूरदृष्टी हे सर्व आम्हाला प्रचंड उपयोगी पडलं. त्यांच्यामुळे लिलावात आम्ही आत्मविश्वासाने उतरलो.”

लिलावातील ‘रॉयल’ खेळी – सिद्धेश लाडची निवड
मुंबईच्या सिद्धेश लाड याला १०.२५ लाखाला घेण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभव आणि स्थैर्य त्याच्याकडून संघाला लाभणार आहे. ही निवड रॉयल्सच्या प्रमुख निर्णयांपैकी एक ठरली.
 

संघ प्रशिक्षक अमित दाणी पुढे म्हणाले की, “लिलावाआधी थोडीशी अनिश्चितता होती. हवे ते खेळाडू मिळतील का, याची चिंता होती. पण आमच्या योजनेवर ठाम राहून आम्ही संतुलन साधले. आता सराव सत्र सुरू करण्याची आणि संघाला मैदानात उतरण्याची उत्सुकता आहे.”

अभिषेक नायर म्हणाले की, “लिलावात आमचं उद्दिष्ट स्पष्ट होतं – ‘हंगर आणि एक्सपीरियन्स’ यांचा संगम असलेला संघ उभारायचा. आम्ही प्लॅनिंगला प्राधान्य दिलं आणि त्याला प्रत्यक्षात उतरवलं. आता खरी तयारी मैदानावर सुरू होईल!” 

एमएससी मराठा रॉयल्सचे मालक रॉयल एज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या कन्सोर्टियममध्ये अलीशा व कपिल बहेटी, मयंक व राज खांडवाला, रंजीत व टीना बिंद्रा हे सहभागी आहेत. त्यांनी लिलावानंतर आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “ही आमच्यासाठी निर्णायक वेळ होती. आमचं स्वप्न होतं – एक ऊर्जावान, तरुण आणि अनुभवी संघ तयार करण्याचं. आम्ही अभिषेक नायर आणि प्रशिक्षक अमित दाणी यांचं मन:पूर्वक आभार मानतो. आता आमचा संघ मैदानात ‘मराठा रॉयल’ म्हणून आपली ओळख निर्माण करणार, यात शंका नाही!”

एमएससी मराठा रॉयल्स संघ 
आयकॉन खेळाडू: तुषार देशपांडे.
इतर खेळाडू: सिद्धेश लाड, इरफान उमैर, आदित्य धुमाळ, सचिन यादव, पराग खानापूरकर, अरमान जाफर, चिन्मय सुतार, मॅक्सवेल स्वामिनाथन, खान अवैस नौशाद, साहिल जाधव, नमन झावर, वरुण राव, रोहन घाग, अजय सिंह जानू, वैभव माळी, यश गाडिया, शश्वत जगताप

 
शिबिराची सुरुवात माहिम क्रिकेट मैदानावर
लिलावानंतरचा पहिला टप्पा म्हणजे सराव शिबीर. एमएससी मराठा रॉयल्सचा प्रशिक्षण कॅम्प शुक्रवारपासून माहिम क्रिकेट मैदानावर सुरू झाला असून, संघ लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी २६ मे ते ८ जून, वानखेडे स्टेडियमवर जोरदार तयारी करत आहे. मुंबईच्या क्रिकेट परंपरेला उजाळा देत, हा संघ या लीगमध्ये एक खास स्थान निर्माण करणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *