
विविध गटात ८०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
नाशिक ः महाराष्ट्र राज्य तायक्वोंदो असोसिएशन (ताम) यांच्या वतीने आयोजित ३४वी राज्य ज्युनियर व सातवी कॅडेट क्योरुगी, तसेच सातवी कॅडेट आणि ११वी ज्युनियर पूमसे तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात उत्साहात पार पडले.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य तायक्वोंदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे, तामचे सचिव गफ्फार पठाण आणि तामचे कोषाध्यक्ष डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तायक्वोंदो खेळ अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात विकसित होत आहे.
या उद्घाटन समारंभास नाशिक सचिव विशाल जगताप, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिनेश नायर, पुणे ग्रामीण प्रतिनिधी नितीन गुंडा, पुणे ग्रामीण सचिव दत्ता कदम, अमरावती प्रतिनिधी किरण भगवत, पालघर सचिव राजा मकवाना, राज्य तायक्वांदो कार्यकारिणी सदस्य पद्माकर कांबळे, धुळे सचिव राहुल कोटे, अहिल्यानगर ग्रामीण सचिव महेश आनंदकर, रायगड ग्रामीण सचिव सचिन माळी, पनवेल शहर सचिव संजय भोईर, मुंबई उपनगरचे असिमसिंग सोधी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांची उपस्थिती स्पर्धेस विशेष महत्त्व व प्रेरणा देणारी ठरली.
या स्पर्धेत ८०० हून अधिक खेळाडू, पंच आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असून, सर्व सामने इंडिया तायक्वोंदोच्या नियमानुसार पार पडत आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व येत्या मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या इंडिया तायक्वोंदो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत करतील.
राज्यभरातील तायक्वोंदोपटू आपली कौशल्ये सादर करत आहेत. महाराष्ट्र राज्य तायक्वोंदो असोसिएशनच्या प्रयत्नांनी अशा भव्य स्पर्धा खेळाडूंना उन्नतीचे व्यासपीठ प्रदान करीत आहेत.