
अमेय बोथारेची अफलातून कामगिरी
मुंबई : सर बेनेगल रामा राव ६३व्या आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धेतील प्लेट गटातील सामना एकतर्फी ठरला! एचडीएफसी बँक एससीच्या विजयात चमकदार ठसा उमटवला तो त्यांच्या तरुण ऑफस्पिनर अमेय बोथारे याने. अमेय याने फक्त ५ धावांत ५ बळी घेत सामना एकहाती फिरवला आणि संघाला ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
रविवारी ओव्हल मैदानावरील सरकारी लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या थरारक लढतीत एचडीएफसी बँकेने ८ षटकांत ५ बाद ९६ धावा केल्या. यामध्ये यश छज्जरने फटकेबाजी करत ४८ धावा करताना संघाला भक्कम आधार दिला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, अभ्युदय बँक एससीचा डाव मात्र कोलमडला. अमेयच्या भेदक माऱ्याला सामोरे जाताना त्यांचा डाव फक्त ७.५ षटकांत ९ बाद ३९ धावा करत आटोपला. शुभ रजकनेही साथ देत २ बळी टिपले. अमेयच्या या कामगिरीमुळे तो या सामन्याचा नायक ठरला.
आयसीआयसीआय बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला ४ विकेटनी पराभूत करत शानदार विजय मिळवला. श्रेयस तांडेलची अष्टपैलू खेळी (४१ धावा व २ बळी) विशेष ठरली. ड्यूश बँकेने बँक ऑफ बडोदावर ७ विकेटनी विजय मिळवला. नितीन देशमुखच्या अर्धशतकासहीत चंदन शिरवळकरच्या ४ बळींचा सामना झाला. सिटी बँकेने कोटक महिंद्रावर १२ धावांनी मात केली. सुशांत शेट्टी व सागर चेंबूरकर यांच्या प्रभावी माऱ्याने हा विजय मिळवता आला.