
अंतिम सामन्यात सीके स्पोर्ट्सवर नऊ विकेटने विजय, यशराज उगले सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने सीके स्पोर्ट्स संघावर नऊ गडी राखून दणदणीत विजय साकारत विजेतेपद पटकावले. या सामन्यात यशराज उगले याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीके स्पोर्ट्स संघाने २५ षटकात आठ बाद १६३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना प्रदीप स्पोर्ट्स संघाने धमाकेदार फलंदाजी करत २१.५ षटकात एक बाद १६७ धावा फटकावत नऊ विकेट राखून सामना जिंकला आणि विजेतेपद संपादन केले.
या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाच्या रुद्राक्ष कार्ले, यशराज उगले या खेळाडूनी धमाकेदार कामगिरी बजावली. रुद्राक्ष कार्ले याने ८२ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना पाच उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. आरोही आहेर हिने ६९ चेंडूत ५४ धावांची जलद खेळी करत सामना संस्मरणीय बनवला. आरोहीने अर्धशतकी खेळीत १० चौकार मारले. अर्शान पठाण याने ६६ चेंडूत ५० धावा फटकावल्या. अर्शान याने सात चौकार व एक षटकार ठोकत अर्धशतक साजरे केले.

गोलंदाजीत यशराज उगले याने अवघ्या २६ धावांत पाच विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या शानदार कामगिरीमुळे यशराज हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मयूर सोमासे याने सहा धावांत दोन बळी घेत आपली चमक दाखवली. अभिषेक कुचेकर याने १२ धावांत एक गडी बाद केला.
प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९ चे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी या स्पर्धेचे अतिशय सुरेख नियोजन केले. स्पर्धा उत्कृष्टरित्या संपन्न झाल्याबद्दल खेळाडूंसह सर्वांनी आदित्य नाईक यांचे अभिनंदन केले आहे.
संक्षिप्त धावफलक
सीके स्पोर्ट्स ः २५ षटकात आठ बाद १६३ (स्वरीत दरक ३८, अर्शान पठाण ५०, रोहित लोंके १२, यश रेंगे १७, अंश अजमेरा ६, इतर २६, यशराज उगले ५-२६, मयूर सोमासे २-६, आर्यन शिंदे १-२८) पराभूत विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स ः २१.५ षटकात एक बाद १६७ (आरोही आहेर नाबाद ५४, रुद्राक्ष कार्ले नाबाद ८२, वरद सुलतान ६, इतर २५, अभिषेक कुचेकर १-१२). सामनावीर ः यशराज उगले.