साईराज परदेशीचे विक्रमी सोनेरी यश

  • By admin
  • May 12, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

कराडच्या तनुजाने पटकावले सुवर्ण पदक; वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके

राजगीर (बिहार) : मनमाडचा साईराज परदेशी याने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये नव्या स्पर्धा विक्रमासह सोनेरी यशाला गवसणी घातल. कराडच्‍या तनुजा पोळ हिनेही वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. १२वीच्या परीक्षेमुळे सरावाला काही दिवस ब्रेक दिल्यामुळे तिला नव्या विक्रमाला गवसणी घालता आली नाही.

राजगीर क्रीडा विद्यापीठाचा परिसरात सुरू असलेल्‍या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. गतस्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या साईराज परदेशी यांने ८१ किलो गटात निर्विवाद वर्चस्व गाजविने. खेलो इंडिया स्पर्धेत माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे, हे दाखवून दिले. त्याने स्नॅचमध्ये तिसर्‍या प्रयत्नात विक्रमी १४० किलो वजन उचलले. त्यानंतर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये त्याने दुसर्‍या प्रयत्नात सर्वाधिक १७२ किलो वजन उचलले. तिसर्‍या प्रयत्नाची गरजही न वाटलेल्या साईराजने एकूण ३१२ वजनाची कामगिरी करत नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. रौप्यपदक विजेत्या आंध्र प्रदेशच्या एम तरूणला (स्नॅचमध्ये १२६, तर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६१ किलो) एकूण २८७ वजनाची कामगिरी करता आली. म्हणजेच साईराज त्याच्यापेक्षा तब्बल २५ किलो वजनाने पुढे होता. उत्तर प्रदेशच्या आयुष राणाने (स्नॅचमध्ये ११९ किलो, तर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १४५ किलो) एकूण २६४ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले.

विक्रमवीर साईराज
नुकताच बारावी पास झालेल्या साईराज परदेशीने ८१ किलो गटात नव्या विक्रमासह सुवर्णयश मिळविताना स्वत:चाच विक्रम मोडला. त्याने स्नॅचमधील स्वत:चाच १३९ किलोचा विक्रम १४० किलो वजन उचलून मोडीत काढला. हीच कमाल त्याने क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्येही केली. त्याने या प्रकारातही स्वत:चा १७१ किलो वजनाचा विक्रम मोडीत काढताना १७२ किलो वजन उचलले. त्यामुळे अर्थातच त्याचा एकूण ३१२ किलो वजन उचलण्याचाही नवा विक्रम प्रस्थापित झाला. प्रवीण व्यवहारे, डी डी शर्मा, अलोकेश बर्वा यांचे साईराज याला मार्गदर्शन लाभलेले आहे.

मुलींच्या विभागात दिल्लीतील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या तनुजा पोळकडून महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदकाची आशा होती. अपेक्षेप्रमाणे तिने सुवर्णयश मिळविले, पण तिला आपल्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. तनुजाने स्नॅचमध्ये ६८ किलोच्या पहिल्या प्रयत्नात फाऊल केले. मग दुसर्‍या प्रयत्नात हे वजन उचलून तिने तिसर्‍या प्रयत्नात ७१ किलो वजन उचलले. क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये तनुजाने दुसर्‍या प्रयत्नात १०० किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने चुरशीच्या लढतीत एकूण १७१ किलो वजन उचलून अवघ्या एक किलो अधिक वजनाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आंध्र प्रदेशच्या थरांगिणी कारंगी हिने स्नॅचमध्ये ७४, तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ९६ किलो असे एकूण १७१ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. आसामची भावना गोगोई  हिने (स्नॅचमध्ये ७५, तर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ९२ किलो) एकूण १६७ किलो वजन कांस्यपदक मिळविले.

तनुजाच्या सुवर्ण यशाला विक्रमाची हुलकावणी
तनुजा पोळ हिने सुवर्णपदक निश्चित केल्यानंतर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमधील अखेरच्या प्रयत्नात खेलो इंडियातील नव्या विक्रमासाठी १०६ किलो वजन उचलण्याचा विडा उचलला. दिल्लीतील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिने स्नॅचमध्ये ७५ किलो, तर क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये विक्रमी १०५ किलो वजन उचलले होते. मात्र, १२वीच्या परीक्षेमुळे तनुजाच्या सरावात थोडा खंड पडला होता. त्याचा परिणाम तिच्या आजच्या कामगिरीवर झाला. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात फाऊल झाल्याने तिला ७१ किलोवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आता क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याची तिला संधी होती. मात्र, सरावातील खंडामुळे तनुजाला १०६ किलो वजन पेलवले नाही. त्यामुळे तिच्या सुवर्णयशाला विक्रमाचे कोंदन लाभू शकले नाही.

कोट

‘गेल्या सात वर्षांपासून मला घरापासून लांब ठेवण्यासाठी काळीज घट्ट केलेल्या आई-वडीलांनाच पहिले या सुवर्ण यशाचे श्रेय जाते. त्यानंतर मला वेटलिफ्टिंगचे धडे शिकविणारे प्रवीण व्यवहारे, त्यानंतर डी डी शर्मा व आताचे प्रशिक्षक अलोकेश बर्वा या सर्वांचा या यशात तितकाच मोलाचा वाटा आहे. आता या खेळात राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धा गाजविण्यासाठी मी रक्ताचे पाणी करीन, एवढी ग्वाही नक्की देतो.’

  • साईराज परदेशी

कोट

‘मी सम्राट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेलो इंडियातील सुवर्णपदक जिंकले. गतवेळी मला पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र, यावेळी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळाल्याने यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता. त्यामुळे या सुवर्णयशाने सहाजिकच मला आनंद झालाय.’

  • तनुजा पोळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *