अॅथलेटिक्स स्पर्धेत शौर्या अंभुरे, सैफ चाफेकरला सुवर्णपदक

  • By admin
  • May 13, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

स्वानंदी सावंतला रौप्यपदक 

पटना (बिहार) : महाराष्ट्राच्‍या धावपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समधील मुलींच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. पहिल्या क्षणापासून आघाडी घेतलेल्या मुलींच्‍या गटात शौर्या अंभुरे व मुलांच्‍या गटात सैफ चाफेकर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रतिस्‍पर्धींनी धावपट्टी चुकविल्‍याने सातव्‍या स्‍थानावर असलेल्‍या महाराष्ट्राच्‍या स्‍वानंदी सावंतला रौप्‍य पदक बहाल करण्यात आले.

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावपटूंनी पहिल्याच दिवशी धमाल केली. १०० मीटर अडथळा शर्यतीत पहिल्या क्षणापासून आघाडी घेतलेल्या शौर्या अंभुरे हिने १४.११ सेंकद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालची सोनाली दास १४.६३ सेंकद वेळेसह तर केरळची विष्णूश्री एन एस ही १४.६२७ सेंकद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी असल्‍याचे घोषित करण्यात आले होते. या दोघींसह चौथ्या, पाचव्‍या च सहाव्‍या धावपटूंनी धावपटू चुकल्‍याने सातव्‍या स्‍थानावर असलेल्‍या स्‍वानंदी सावंतला पदक बहाल करण्यात आले.

मुलांच्‍या १०० मीटर अडथळा शर्यतीतही महाराष्ट्राच्‍या सैफ चाफेकरने १३.४८ सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्ण कामगिरी केली. तामिळनाडूच्‍या आर सी अर्जुनने रौप्‍य तर झारखंडच्‍या एम डी साजीदने कांस्य पदकाचे यश संपादन केले. नवी मुंबई सराव करणाऱ्या सैफ चाफेकरचे हे खेलो इंडिया स्‍पर्धेतील पहिलेच पदक आहे. गत स्‍पर्धेत त्‍याला चौथ्या स्‍थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा सुसाट धाव घेत त्‍याने सुवर्णयशाला गवसणी घातली.

सुवर्णपदक विजेती शौर्या अंभुरे ही आयपीएस अधिकारी अविनाश अंभुरे यांची मुलगी असून १० वीच्‍या परीक्षेत तिला ९० टक्‍के गुण संपादन केले आहे. ज्‍युनियर आशियाई कांस्यपदक जिंकणाऱ्या शौर्याने पर्दापणातच खेलो इंडिया स्‍पर्धेत सुवर्ण धाव घेतली आहे. ठाणे शहरात डॉ. अजित कुलकर्णी यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *