
- राजेश भोसले, जलतरण साक्षरता मिशनचे संकल्पक.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा भारतातील पहिला १०० टक्के जलतरण साक्षर जिल्हा व्हावा असा “शिव संकल्प” राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन च्या वतीने जाहिर करण्यात आला आहे. कारण जलतरण साक्षरतेची मुहूर्तमेढ ही जगात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर शहरातच रोवली गेली आहे.
जागतिक जलतरण साक्षरता दिन आणि राष्ट्रीय जलतरण साक्षरता दिन साजरा करण्याचे संपूर्ण श्रेय सुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरालाच जाते. एवढेच नव्हे तर यापुढे एक ही शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, तसेच सामान्य नागरिकांचा पोहता येत नाही म्हणून व पाण्यात बुडून अपघाती मृत्यू होवू नये म्हणून प्रत्येकाला जल व तरण या विषयीची माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण मिळावे म्हणून राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनची स्थापना सुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरातच झाली आहे व हे कार्य अधिक जोमाने सुरू आहे.
संपूर्ण जगभरात दरवर्षी सुमारे अडीच ते तीन लाख लोक पोहता येत नाही म्हणून पाण्यात बुडून मृत्यू मुखी पडतात, असे डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे. वर्षभरात एक दिवस २५ जुलै रोजी ” वर्ल्ड डॉवनिंग प्रिवेनशन डे” साजरा करून जनजागृती करण्याचे निर्देश डब्ल्यूएचओने दिले आहेत. आता याच जागतिक जलतरण साक्षरतेच्या अभियानात मैलाचा दगड ठरावा असा “शिव-संकल्प” म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा भारतातील पहिला १०० टक्के जलतरण साक्षर जिल्हा व्हावा व या जिल्ह्याचे नावलौकिक संपूर्ण जगभर व्हावे. कारण तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जगप्रसिद्ध ऐतिहासिक शहराला याच जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले धर्मवीर, शुरवीर, ज्ञानवीर, परमप्रतापी, अजेय असे “शिवपुत्र” छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आपल्या जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.
विश्व पटलावर छत्रपती संभाजीनगरचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे तिथे दोन जागतिक वारसा स्मारके आहेत. नजीकच्या भविष्यात आणखी दोन स्मारकांची भर पडेल अशी आशा आहे. यात माझे योगदान शून्य आहे. माझे काही तरी योगदान यामध्ये असावे व मी छत्रपतींचा सच्चा मावळा व एक सुजान नागरिक या नात्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडावी, आपल्या जिल्ह्याचे नाव नव संकल्पनेतून विश्व पटलावर उमटावे म्हणून जलतरण साक्षरतेचा “शिव संकल्प” घेण्यात आला आहे.
याचे मुख्य कारण जलतरण साक्षरता ही काळाची गरज झाली आहे. पोहता न आल्यामुळे होणाऱ्या अपघाता विषयी तर जनजागृती करूच पण प्रत्येकाला केजी ते पीजी पर्यंत जलतरण साक्षरता पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण ही पंच सूत्री देण्यासाठी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे मोहनराव सोनवणे, अशोक जगताप, बाळासाहेब थोरात, डॉ पंडीत पळसकर, रवींद्र निकम, अॅड गोपाल पांडे, संतोष जोशी, राजेश काळे, रमेश शिंदे, डॉ सारंग व्यवहारे, नितीन घोरपडे, डॉ संदीप जगताप, पंकज भारसाखळे, अशोक काळे, विश्वास पाटील, जयंत देशपांडे, नासेर खान, गजानन टेहरे, विष्णू लोखंडे, डॉ सुनील देशमुख, डॉ शिवाजी पोले, डॉ विजय व्यवहारे, धनंजय फडके ही राष्ट्रीय कार्यकारणी अविरत परिश्रम घेत आहेत.