जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राला १२ पदके

  • By admin
  • May 13, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

५ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांची लयलूट

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स प्रकारात पाच सुवर्णपदकांसह बारा पदकांची लयलूट करीत मंगळवारचा दिवस गाजविला.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये ओव्हर ऑल प्रकारात मुंबईची परिनाने मदनपोत्रा हिने ८३.६५० गुणांसह सुवर्ण जिंकले, तर मुंबईच्याच शुभश्री मोरे हिने ८०.२०० गुण घेत रौप्यपदक मिळवले. दिल्लीच्या राचेल दीपच्या वाट्याला कांस्यपदक आले.

हूप प्रकारातही परिना हिनेच बाजी मारली. तिने दिल्लीच्या राचेलदीप (१९.३००) हिला मागे टाकून २१.०५० गुण मिळवले. महाराष्ट्राची देवांगी पवार (१८.७२५) कांस्यपदकाची मानकरी ठरली. बॉल प्रकारात आपली सहकारी परिनाला मागे टाकून किमया कार्ले हिने २०.५०० गुणांसह सुवर्ण आपल्या नावे केले. परिनाने २०.१५० गुण मिळवले. दिल्लीच्या राचेल याने कांस्य मिळवले.

क्लब प्रकारात मुंबईची शुभश्री मोरे अव्वल ठरली. तिने २०.६०० गुण घेत परिनाला मागे टाकले. परिनाने १९.७५० गुणांची कमाई केली. हरियाणाच्या मिष्काने १९.५०० गुणांसह कांस्यपदक मिळवले. रिबन प्रकारात बाजी मारत परिनाने स्पर्धेतील तिसर्‍या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले. रिबनमध्ये तिने २०.६५० गुण, तर रौप्यविजेत्या शुभश्री मोरेने १९.८५० गुण घेतले.

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकांची लयलूट केली असतानाच आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स प्रकारामध्ये मात्र सुवर्ण पदक हुकले. मुंबईच्या अनुष्का पाटीलने ४२.०६७ गुण घेत रौप्यपदक मिळवले. तेलंगणाच्या निशिका अगरवाल हिने ४४.३३३ गुण घेत सुवर्णपदक पटकावले, तर ४१.२३३ गुण मिळवणारी ठाण्याची सारा राऊळ कांस्यपदकाची मानकरी ठरली.

परिना सुवर्ण हॅटट्रिक
रिदमिक जिम्नॅस्टिक्स प्रकारात परिना मदनपोत्रा हिने लक्षवेधी कामगिरी करताना ३ सुवर्णपदके जिंकली. तिने रिबन, बॉल यासह ओव्हर ऑल प्रकारात सुवर्ण जिंकले. मागील वर्षी संयुक्ता काळे या खेळाडूने पाच सुवर्ण जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *