क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांचा खुलासा
नियम : विभागीय चाचणीस उपस्थित असल्यानंतर पाठवता येत नाही
सोलापूर ः महाराष्ट्र खो-खो संघाच्या निवडीत घोळ हे वृत्त दैनिक स्पोर्ट्स प्लसमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर क्रीडा उपसंचालक कार्यालय खडबडून जागे झाले आहे. क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी दिलेल्या खुलासानुसार नरेश चांदणे हा खेळाडू गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. त्यामुळे त्याची राज्य चाचणीसाठी शिफारस केली. त्यामुळे सदरच्या वृत्तात काही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, क्रीडा खात्याच्या महाराष्ट्र संघ निवड निकषातील नियम क्रमांक ८.११ नुसार जे खेळाडू विभागीय स्पर्धेत/चाचणीत सहभागी होऊ शकले नाहीत, अशा खेळाडूंना राज्य स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणीसाठी पूर्ण खात्री करूनच उपसंचालक शिफारस करतील.
हा नियम प्राथमिक स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूला जिल्हा किंवा विभाग स्तरावर सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत गतवर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेला खेळाडू क्रीडा उपसंचालक निवड चाचणीसाठी शिफारस करू शकतात. मात्र, नरेश चांदणे हा खेळाडू जिल्हास्तरावर सहभागी होऊन त्याची निवड विभाग स्तरावर खेळाडूंमध्ये करण्यात आलेली होती आणि तो विभागीय निवड चाचणीसाठी उपस्थित राहिलेला होता. त्या चाचणीतून त्याची निवड झाली नसल्याने क्रीडा उपसंचालकानी नियमबाह्य शिफारस करून निवड समितीच्या संगणमताने १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठीही निवड केली आहे.
शिल्लक फुटबॉलचा मात्र खुलासा नाही
भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने वातावरण तयार होण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने एकाच दिवशी म्हणजे १० लाख विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळावे असे नियोजन १५ सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळांना तीन फुटबॉल देण्याचे जाहीर केले होते. यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून १०१२ शाळांंची ऑनलाइन नोंदणी झाली होती. तेव्हा युवराज नाईक हे सोलापुरात जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते.
सर्व शाळांना प्रत्येकी ३ प्रमाणे ३०३६ फुटबॉल वाटप झाल्याचा व शिल्लक फुटबॉल नसल्याचा अहवालही त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. परंतु फुटबॉलचे कित्येक बॉक्स जिल्हा क्रीडा कार्यालयात पडून होते. याबाबतचे वृत्त सप्टेंबर २०१७ मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याची चौकशी झाली. ती चौकशी कागदावरच राहिली आणि अजूनपर्यंत क्रीडा कार्यालयात काही फुटबॉलचे बॉक्स शिल्लक आहे, असे वृत्तही स्पोर्ट्स प्लसमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते. परंतु याचा खुलासा मात्र क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केलेला नाही.