
- महाराष्ट्राचा आदित्य पिसाळ वेगवान धावपटू
- जान्हवीला सुवर्ण, शौर्याला रौप्य, रुद्र आणि कशिशला कांस्य
पटना (बिहार) : महाराष्ट्राच्या धावपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार झळकावत दिवस गाजवला. स्पर्धेतील वेगवान धावपटूंचा मान महाराष्ट्राच्या आदित्य पिसाळ याने पटकविला. शौर्या अंबुरे हिने पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. ३ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य पदकाची कमाई महाराष्ट्राने केली.
पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत आदित्य पिसाळला सुवर्ण, तर रूद्र शिनीला कांस्यपदक मिळाले. मुलींच्या गटात शौर्या अंबुरे हिने रौप्य पदकाची कमाई केली. ४०० मीटर शर्यतीत कशिश भगतने कांस्यपदक जिंकले. मुलींच्या १५०० मीटर शर्यतीत जान्हवी हिरूडकर सुवर्णपदक पटकावले.
मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत महाराष्ट्राने दुहेरी धमाका केला. आदित्य पिसाळ याने १०.६२ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर रूद्र शिनी याने १०.७८ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले. नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील हे दोघे खेळाडू श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. बिहारच्या प्रिन्स कुमारने १०.६४ सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली.
नागपूरच्या जान्हवी हिरूडकर हिने १५०० मीटर शर्यतीत ४ मिनिटे ३५.६९ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. दिल्लीची माही ४ मिनिटे ४२.८९ सेंकद वेळेसह रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर कर्नाटकच्या प्रणाथी हिने ४ मिनिटे ४५.०८ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
मुलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीमध्येही महाराष्ट्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आदित्य पिसाळ, अर्जुन देशपांडे, रुद्रा शिंदे व सैफ चाफेकर यांनी महाराष्ट्रासाठी सोनेरी कामगिरी केली.
अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेल्या शौर्या अंबुरे हिने मुलींच्या शंभर मीटर शर्यतीत १२.०२ सेंकद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. हरियाणाची प्रिशा मिश्रा ११.८५ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तर तिचीच सहकारी आरती हिने १२.०५ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले. १५ वर्षीय शौर्या अंबुरे ही गेल्या ९ वर्षांपासून अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शंनाखाली सराव करते. सौदी अरेबियात झालेल्या युवा आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
मुलींच्या ४०० मीटर शर्यतीत नागपूरच्या कशिश भगत हिने ५६.८३ सेंकद वेळेसह महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. ती राम वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तामिळनाडूच्या इदविना जॅसन हिने ५५.९० सेंकद वेळेसह सुवर्ण, तर हरियाणाच्या दीपिकाने ५६.६६ सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले.