महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंची सहा पदकांची कमाई

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

१ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य पदके पटकावली

पटना (बिहार) : महाराष्ट्राच्या युवा मल्लांनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार झळकावत मैदान गाजवले. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण ६ पदकांची कमाई महाराष्ट्रांच्या मल्लांनी केली.

ज्ञानभवन सांस्कृतिक हॉलमध्ये सुरू असणार्‍या कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारातील ८० किलो गटात सांगलीच्या परम माळी याने अंतिम लढतीत हरियाणाच्या सचिनकुमारचा भारद्वांज डावावर ५-० गुणांनी मात करून सुवर्णपदक पटकावले. पहिल्यापासून आघाडी घेत परमने आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन घडवले. पहिल्या फेरीत ५-० गुणाने आघाडीवर असतानाच हरियाणाच्या सचिनकुमारने दुसर्‍या फेरीत खेळण्यास असमर्थता दाखविल्याने परमला विजयी घोषित करण्यात आले.

मुलांच्या ५१ किलो फ्रीस्टाईल प्रकारात कोल्हापूरातील राधानगरीच्या प्रणव घारे याला चुरशीच्या अंतिम लढतीत हरियाणाच्या हर्षकुमारकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या फेरीत १-० गुणाने प्रणवने आघाडी घेतली होती. निर्णायक दुसर्‍या फेरीत तो मागे पडला. हर्षकुमारने आक्रमक पवित्रा घेत १-६ गुणांनी बाजी मारली.

९२ किलो फ्रीस्टाईल अंतिम लढतीत पुण्याच्या सुरज चोरगेवर हरियाणाच्या अर्जुनकुमारने ०-६ गुणांनी मात केली. आक्रमक कुस्ती करीत अर्जुनकुमारने हरियाणाचे कुस्तीतील वर्चस्व दाखवून दिले. सुरज हा पुण्यातील हनुमान आखाडा येथे प्रशिक्षक गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.

मुलींच्या ६२ किलो फ्रीस्टाईल गटात अकोला येथील स्मृती श्रीनाथने राजस्थानच्या चंचल माळीवर १०-० गुणांनी मात करीत कांस्यपदकावर नाव कोरले. ५५ किलो ग्रीको रोमनच्या कांस्य पदकाच्या लढतीत कोल्हापूरच्या आदित्य ताटेने कर्नाटकच्या हनुमंत तुंगलवर १०-० गुणांनी एकतर्फी मात केली. रिक्षा चालकाचा मुलगा असाणार्‍या आदित्यचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील दुसरे कांस्य पदक आहे.

कोल्हापूरच्याच हर्षवर्धन जाधवने ५१ किलो फ्रीस्टाईल प्रकारात उत्तरप्रदेशच्या मुकेश यादवला ६-१ गुणांनी नमवून कांस्यपदकावर नाव कोरले. १५ वर्षीय हर्षवर्धनच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचे चुलते विनायक जाधव यांचे त्याला कुस्तीसाठी पाठबळ लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *