
सेलू ः बिहार येथे सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघाने कांस्यपदक जिंकले. या संघातील सेलूच्या वैभव जगन्नाथ रोडगे याने सांघिक कांस्यपदक संपादन केले. तसेच महाराष्ट्र राज्य मुलांच्या खो-खो संघाचे प्रशिक्षक संजय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य रग्बी संघातील खेळाडू गौरी शिंदे यांचा सेलू येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रग्बी मुले संघाने कांस्यपदकाच्या लढतीत दिल्ली संघाचा पराभव करत महाराष्ट्र संघास वैभव रोडगे यांनी कांस्यपदक पटकावले. या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक माधव लोकुलवार, योगासन जिल्हा सचिव डी डी सोन्नेकर, प्रा नागेश कान्हेकर, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, सुभाष मोहेकर, भगवान जाधव, विजय पांडे, सुरेश रोडगे, सचिन रोडगे व राज्य राष्ट्रीय खेळाडू यांनी स्वागत करुन अभिनंदन केले.
कांस्यपदक विजेता वैभव जगन्नाथ रोडगे म्हणाला की, नूतन विद्यालय येथे कबड्डी खेळाचा सराव करताना रग्बी खेळाची आवड निर्माण झाली. माझा रग्बी या खेळाचा प्रवास शालेय स्तरावर सुरू झाला. माझी रग्बी खेळाची पहिली स्पर्धा जिल्हास्तरीय होती. तेथून आमची रग्बी खेळाला सुरुवात झाली. मग आमचा रग्बी खेळाचा संघ तयार झाला. आम्ही अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. आम्हाला प्रशिक्षणासाठी या सीनियर खेळाडूंनी खूप मदत केली. विजय पांढरे, काशीफ शेख, वैभव खुणे यांची मदत झाली. रग्बी खेळासाठी माझ्या आई-वडिलांचा व संपूर्ण घरच्यांचा पाठिंबा होता. पण माझ्या शाळेतील म्हणजेच नूतन विद्यालयातील प्रशांत नाईक, गणेश माळवे, डी डी सोनेकर, नागेश कान्हेकर, योगेश आदमे व जिल्हा संघटनेचे सचिव शिवाजी खुणे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र रब्बी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि मी त्या संधीचे सोने केले व महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. याचा मला विशेष आनंद होत आहे, असे वैभवने सांगितले.