
जळगाव ः हॉकी महाराष्ट्र पुणे व हॉकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी पुणे येथे ७ ते ९ मे रोजी झालेल्या हॉकी झोनल लेवल टु या अभ्यासक्रमात जळगाव जिल्ह्यातील हॉकीचे खेळाडू वर्षा सोनवणे व इम्रान बिस्मिल्ला यांची निवड झाली होती. या दोघांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मागील वर्षी सुद्धा त्यांनी लेवल वनची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
त्यांना या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पंच रिपु दमन (आयएएस), फहीम खान व दीपक जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल हॉकी जळगावतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष डॉ अनिता कोल्हे यांच्या हस्ते त्यांना बुके व क्रीडा साहित्य देण्यात आले. यावेळी हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, प्रशिक्षक हिमाली बोरोले, ममता प्रजापत, भावना कोळी आदींची उपस्थिती होती.