
सामनावीर अभिराम गोसावीची प्रभावी गोलंदाजी, आदित्य शिंदेचे शतक हुकले
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमजीए अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत नंदुरबार संघाविरुद्ध पावसामुळे छत्रपती संभाजीनगर संघाचा निर्णायक विजय हुकला. अभिराम गोसावी याने प्रभावी गोलंदाजी करत सामना गाजवला आणि सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांनी नंदुरबार संघाचा पहिला डाव १९ षटकात अवघ्या ७१ धावांत गुंडाळला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने फलंदाजी करत पहिल्या डावात ४७.३ षटकात सर्वबाद २२६ धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व मिळवले. नंदुरबार संघाचा दुसरा डाव देखील गडगडला. १४ षटकांत नंदुरबार संघाचे सात फलंदाज अवघ्या २९ धावांत बाद झाले होते. परंतु, रात्री पाऊस झाल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर संघाचा निर्णायक विजय हुकला.
या सामन्यात आदित्य शिंदे याने ९४ धावांची धमाकेदार खेळी केली. आदित्यचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. त्याने १३ चौकार मारले. सोहम नरवडे याने आठ चौकारांसह ३९ धावांची दमदार खेळी साकारली. अर्णव मांगुरुळकर याने ३१ चेंडूत २३ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले.
गोलंदाजीत अभिराम गोसावी याने ३९ धावांत सहा विकेट घेऊन नंदुरबार संघाची दाणादाण उडवून दिली. या कामगिरीमुळे अभिरामची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. गौरव निते याने ८४ धावांत सहा गडी बाद केले. ध्रुव पुंड याने ११ धावांत चार विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
नंदुरबार ः पहिला डाव ः १९ षटकात सर्वबाद ७१ (राम खोमने ८, खुशाल परळकर २२, समर्थ गाडे २०, अभिराम गोसावी ६-३९, ध्रुव पुंड ३-१५, अर्श कुरेशी १-११).
छत्रपती संभाजीनगर ः पहिला डाव ः ४७.३ षटकात सर्वबाद २२६ (राघव नाईक १०, आदित्य शिंदे ९४, अर्णव मांगरुळकर २३, सोहम नरवडे ३९, समर्थ पुरी १३, अभिराम गोसावी १७, मुफद्दल ताहेर टाकसाळी नाबाद १०, गौरव निते ६-८४, युवराज शर्मा २-२०, यश शेवाळे १-३७, इशान माने १-३४).
नंदुरबार ः दुसरा डाव ः १४ षटकात सात बाद २९ (राम खोमने ७, ध्रुव पुंड ४-११, अभिराम गोसावी २-१२). सामनावीर ः अभिराम गोसावी.