
एमसीए अंडर १६ क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीस पात्र
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने एफ गटात २१ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले. त्यामुळे सोलापूर संघ अव्वल साखळी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शेवटच्या साखळी सामन्यात सोलापूर संघाने पुण्याच्या एमसीव्हीएस संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवित ३ गुण वसूल केले.



छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सामन्यात सोलापूरने प्रथम फलंदाजी करताना ९० षटकात ७ गडी बाद ३०० धावा केल्या. यात सोहम कुलकर्णी याने नाबाद १३७ धावा करीत शानदार शतक साजरे केले. दर्शील फाळके (४०), इंदात जैन (२५) व विरांश शर्मा (२२) यांनी त्यास साथ दिली. पुण्याकडून साद पठाण याने ७५ धावात तर मनवेंद्र सिंह ४१ धावात प्रत्येकी दोन बळी टिपले. ईशान मिश्रा, हाफिज शेख व श्रेयस शिवलकर यांनी प्रत्येकी एक बळी गडी बाद केला.
३०१ धावांचे विजयी लक्ष्य गाठणाऱ्या पुण्याचा डाव १९३ धावात संपुष्ठात आला. पुण्याकडून आदित्य गुरुदासणी (३८), ओम भगत (४०) व साद साबीर (४३) यांनी फलंदाजीत कामगिरी केली. सोलापूरकडून सोहम कुलकर्णीने ६३ धावात ४ बळी, मयंक पात्रेने २६ धावांत ३ बळी टिपले. श्रवण माळीने ३३ धावांत दोन तर इदांत जैन याने १६ धावात एक गडी बाद केला.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, चेअरमन आमदार रणजीत दादा मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी अध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे व सचिव चंद्रकांत रेंबरसो यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.