
ऋतुजा गुरवला सुवर्ण, आदित्य थाटेला कांस्यपदक
मुंबई ः साई आरसी मुंबईने दत्तक घेतलेल्या आखाड्यातील कुस्तीपटूंनी बिहार येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी बजावली आणि एक सुवर्ण व एक कांस्य अशी दोन पदके जिंकली. हा साई आरसी मुंबई केंद्रासाठी मोठा गौरवाचा क्षण आहे.
धुळे येथील हर हर महादेव आखाड्यातील ऋतुजा गुरव हिने सुवर्णपदक जिंकून स्पर्धा गाजवली. तिने ४६ किलो वजन गटात दमदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले. शासकीय कुस्ती केंद्र (आखाडा) कोल्हापूर येथील आदित्य थाटे याने ५६ किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले. त्याने ग्रीको-रोमन प्रकारात कांस्य पदक जिंकून आपला ठसा उमटवला. या लक्षवेधक कामगिरीबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी पदक विजेत्या कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.