
छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः यश जाधव सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने एसएनआयसी संघाचा २८ धावांनी पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात यश जाधव याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात पाच बाद १३० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एसएनआयसी संघाने २० षटकात आठ बाद १०२ धावा काढल्या. पटेल हॉस्पिटल संघाने २८ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली.

या सामन्यात अनुष दहिफळे याने शानदार फलंदाजी केली. त्याने ४१ चेंडूत ३६ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. अर्शान पठाण याने ४२ चेंडूत ३५ धावांची वेगवान खेळी केली. त्याने चार चौकार मारले. दिव्या संतोष जाधवने ३१ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी केली. तिने एक चौकार मारला.
गोलंदाजीत यश जाधव याने १५ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. या प्रभावी स्पेलमुळे यश जाधवला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अब्दुल हादी मोतीवाला याने १७ धावांत दोन गडी बाद केले. अदनान देशमुख याने १६ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
पटेल हॉस्पिटल पाचोड ः २० षटकात पाच बाद १३० (प्रतीक कदम ५, दानिश शेख १२, अनुष दहिफळे ३६, अर्शान पठाण ३५, शिव सिंग नाबाद ७, इतर ३२, अब्दुल हादी मोतीवाला २-१७, अदनान देशमुख २-१६, मुफद्दल ताहेर तक्साली १-१६) विजयी विरुद्ध एसएनआयसी ः २० षटकात आठ बाद १०२ (तन्मय औराडे ९, अंश चुडीवाल ८, मुफद्दल ताहेर टाकसाळी २७, दर्शिल पटेल ९, दिव्या जाधव २८, इतर १८, यश जाधव ३-१५, उत्कर्ष पाटील १-१५). सामनावीर ः यश जाधव.