
ॲथलेटिक्स शिबीर ५ मे पासून, परंतु खेळाडूंना सकस नाश्ता १५ पासून
सोलापूर ः महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने २० मे पर्यंत आयोजित केलेल्या नऊ खेळांचे प्रशिक्षण शिबीर पाच मे पासून सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु खो-खो व कबड्डीचे प्रशिक्षण शिबीर सुरू नव्हते.
याबाबतचे वृत्त दैनिक स्पोर्ट्स प्लसमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ११ मे पासून खो-खोचे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा कार्यालयात नुकतीच सरळ सेवेतून नियुक्ती केलेली राष्ट्रीय खेळाडू मयुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.
कबड्डीचे प्रशिक्षण १४ मे पासून जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. तत्पूर्वी, ५ मे पासून जिल्हा क्रीडा संकुल येथे दत्तात्रय वरकड व सूर्याजी लिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानी खेळाचे प्रशिक्षण शिबीर सुरू झाले. परंतु या सर्वच खेळाडूंना सकस नाश्ता मिळत नव्हता. अखेर सकस नाश्ताही १५ मे पासून मैदानी, खो-खो व कबड्डीच्या खेळाडूंना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिबिरार्थी खेळाडू आनंदी दिसत होते. यावेळी या प्रशिक्षण शिबिराचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे मैदानावर उपस्थित होते.