दापोलीत रत्नागिरी झोनल क्रिकेट अकादमी सुरू होणार

  • By admin
  • May 16, 2025
  • 0
  • 32 Views
Spread the love

एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांची माहिती

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे रत्नागिरी झोनल क्रिकेट अकादमी सुरू केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.

दापोलीतील रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आणि उपक्रम जाहीर करण्यात आले. या परिषदेला एमसीएचे सेक्रेटरी कमलेश पिसाळ, जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बिपिन बंदारकर, तसेच एमसीए ॲपेक्स बॉडीचे सर्व सदस्य उपस्थित होते. ॲपेक्स पदाधिकाऱयांची बैठक देखील याच ठिकाणी पार पडली. या बैठकीचे नियोजन अनिल छाजर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

यावेळी एमसीएच्या वतीने घेण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती अध्यक्ष रोहित पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दापोली येथे रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्ट या ठिकाणी रत्नागिरी झोनल क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

झोनल क्रिकेट ॲकॅडमी विकास
‘अजय शिर्के महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी’ ही मुख्य ॲकॅडमी पुण्यात कार्यरत होत आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावर ४ झोनल ॲकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात रत्नागिरी झोनल ॲकॅडमीपासून केली जाणार आहे. इतर तीन झोनल ॲकॅडमीसाठी जागा अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा संघटनांच्या मैदान विकासासाठी आर्थिक सहाय्य
राज्यातील जिल्हा खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून मैदान विकासासाठी ६ जिल्हा संघटनांना प्रत्येकी ७५ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कोल्हापूर, जालना, परभणी, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या त्या जिल्हा संघटना आहेत. उर्वरित जिल्हा संघटनांना देखील विकास अहवालाच्या आढाव्यानंतर अशाच प्रकारे आर्थिक मदत दिली जाणार आहे.

खेळाडू घडवण्यासाठी व्यापक दृष्टीकोन
एमसीएचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे नसून, तर त्या माध्यमातून राज्यातील होतकरू क्रिकेटपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करणे हा आहे. एमपीएल आणि डब्ल्यूएमपीएल या दोन्ही स्पर्धा हेच व्यासपीठ देण्याचे काम करत आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पुढील काळात अशाच अनेक भरीव उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील क्रिकेटची वाढ होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत असे अध्यक्ष रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *