
खेलो इंडिया युथ गेम्स ः जान्हवी जाधवला रौप्यपदक
लातूर ः राजगीर (बिहार) येथे ११ ते १५ मे या कालावधीत झालेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत तलवारबाजी खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचा खेळाडू साईप्रसाद संग्राम जंगवाड याने ईपी वैयक्तिक व सांघिक प्रकारात भारतातून सर्वप्रथम येत दोन सुवर्णपदक पटकावले. तसेच जान्हवी गणपतराव जाधव हिने रौप्य पदक पटकावले आहे.
साईप्रसाद जंगवाड याने वैयक्तिक खेळात अनुक्रमे मणिपूर, हरियाणा व अंतिम सामन्यात गुजरातच्या मनीष कुमार याचा १५-१० अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. वैयक्तिक खेळातील सर्व सामने साईप्रसाद याने एकतर्फी जिंकले हे विशेष. सांघिक प्रकारात पंजाब, मणिपूर व अंतिम सामन्यात हरियाणाचा ४५-४३ असा पराभव करत सुवर्णपदक प्राप्त केले. अंतिम सामन्यात साईप्रसाद याने ४५ पैकी २३ पॉईंट घेऊन मोलाची कामगिरी बजावली.
खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करुन एक नवा इतिहास रचणाऱया साईप्रसाद यशवंत विद्यालय, अहमदपूर या शाळेतून दहावी परीक्षा ७६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे. तसेच जान्हवी गणपतराव जाधव हिने इपी सांघिक प्रकारात उत्तराखंड संघाला ४५-३१ व कर्नाटक संघाला ४५-३९ असा पराभव करून द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक प्राप्त केले. जान्हवी जाधव ही सध्या किलबिल इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीत शिकत आहे. या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले, वजीरोदीन काजी, मोसिन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या गुणवंत खेळाडूंचे जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, वैभव कज्जेवाड, यशवंत विद्यालय अहमदपूर, किलबिल नॅशनल स्कूल व लातूरच्या सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.