
पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा १७ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विरेश एस याने, तर मुलींच्या गटात निहिरा कौल यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात नवव्या फेरीत पहिल्या पटावर विरेश एस याने अविरत चौहानचा पराभव करून ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. विरेश याने क्वीन्स गॅम्बिट पद्धतीच्या ओपनिंगने डावाचा प्रारंभ केला. विरेश हा सिटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावी इयत्तेत शिकत आहे. तर, प्रथमेश शेरलाने भुवन शितोळे चा पराभव करून ७.५ गुण याने दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या पटावरील लढतीत श्लोक याने आरव धायगुडे याचा पराभव करून ७.५ गुण याने तिसरा क्रमांक मिळवला.
मुलींच्या गटात सातव्या फेरीत निहिरा कौल हिने श्रावणी उंडाळे हिला बरोबरीत रोखले व ६ गुणांसह विजेतेपद पटकावले. निहिरा हिने फ्रेंच डिफेन्स पद्धतीने आपल्या डावास सुरुवात केली व ४२ चालीमध्ये श्रावणी उंडाळेला बरोबरीत रोखले. निहिरा ही पवार पब्लिक स्कूल मध्ये आठवी इयत्तेत शिकत आहे. तर, सई पाटील हिने दुर्वा बोंबलेचा पराभव करून ६ गुण हिने दुसरे स्थान मिळवले. अनुष्का कुतवळ हिने मेहेक कटारियाचा पराभव करून ५.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राष्ट्रीय बुद्धिबळपटू व बुद्धिबळ प्रशिक्षक अनिल राजे, पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर आयए विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.