
यमलच्या शानदार गोलमुळे संघ जिंकला
बार्सिलोना ः स्पेनचा स्टार युवा फुटबॉलपटू लामिन यमलच्या शानदार गोलमुळे बार्सिलोनाने गुरुवारी एस्पॅनियोलला २-० असे हरवून दोन सामने शिल्लक असताना २८ व्यांदा ला लीगा विजेतेपद जिंकले. ला लीगा ही स्पेनमधील सर्वोच्च स्थानिक फुटबॉल लीग आहे.
पहिल्या हाफमध्ये गोलशून्य खेळ झाल्यानंतर, १७ वर्षीय यमालने ५३ व्या मिनिटाला बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली आणि फर्मिन लोपेझने स्टॉपेज टाइममध्ये (९०+५ मिनिटे) गोल करून संघाचा २-० असा विजय निश्चित केला. एफसी बार्सिलोनाचा हा ३६ सामन्यांतील २७ वा विजय आहे आणि संघाने ८५ गुणांसह जेतेपद निश्चित केले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रिअल माद्रिदचेही तेवढ्याच सामन्यांमध्ये ७८ गुण आहेत आणि आता त्यांना बार्सिलोनाची बरोबरी करणे शक्य नाही.
यमलचे शानदार ड्रिब्लिंग
यामालने त्याचा शानदार हंगाम आणखी संस्मरणीय बनवला जेव्हा त्याने एस्पॅनियोलच्या दोन बचावपटूंना हरवले आणि त्याच्या विशिष्ट शैलीत डाव्या पायाने गोलपोस्टच्या कॉर्नरमध्ये चेंडू मारून गोल केला. गेल्या वर्षी स्पेनच्या युरो कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यमलने आपल्या ड्रिब्लिंग आणि प्लेमेकिंग कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आणि त्याला भविष्यातील सुपरस्टार का म्हटले जाते हे दाखवून दिले. यामाल सोबत, रफिन्हा आणि पेड्री सारख्या स्टार खेळाडूंनी या हंगामात बार्सिलोना संघाची मोहीम संस्मरणीय बनवली.
पेड्रीचा २०० वा सामना खास ठरला
बार्सिलोनाकडून हा २२ वर्षीय पेड्रीचा २०० वा सामना होता. ८० व्या मिनिटानंतर एस्पॅनियोलला १० खेळाडूंसह खेळावे लागले. चेंडूच्या वादात यमलच्या पोटात मारल्याबद्दल लिआंड्रो कॅब्रेरा याला लाल कार्ड दाखवण्यात आले. लोपेझने स्टॉपेज वेळेत गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ला लीगाच्या इतर सामन्यांची स्थिती
इतर सामन्यांमध्ये, चौथ्या स्थानावर असलेल्या अॅथलेटिक बिल्बाओने गेटाफेवर २-० असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीगमध्ये आपले स्थान निश्चित केले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या अॅटलेटिको माद्रिदला ओसासुनाविरुद्ध २-० असा पराभव पत्करावा लागला, तर रेया व्हॅलेकानोशी २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर रिअल बेटिसला पाचव्या स्थानावर राहून चॅम्पियन्स लीग पात्रता फेरीसाठी संघर्ष करावा लागेल. हा संघ ५९ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.