
लखनौ ः १३व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. विजेत्या खेळाडूंची दीव व दमण येथे होणाऱया खेलो इंडिया बीच स्पर्धेसाठी झाली आहे.
के डी बाबू सिंग स्टेडियम येथे १३ व्या वरिष्ठ वयोगट राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मान्यतेने उत्तर प्रदेश पिंच्याक सिलॅट असोसिएशनने केले होते. या स्पर्धेसाठी २८ राज्यातील, ८ केंद्रीय प्रदेश व सर्व डिफेन्स फोर्सेसच्या ८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ६ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके मिळवत स्पर्धा गाजवली. फर्स्ट रनर अप संघ ३ सुवर्ण, ६ रौप्य, १० कांस्य पदकांसह जम्मू काश्मीर संघ उपविजेता ठरला. दुसरा रनर अप संघ ३ सुवर्ण, ३ रौप्य, ६ कांस्य पदके मिळवून उत्तर प्रदेश संघ तिसऱ्या स्थानी राहिला.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक, उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री गिरीश चंद्र यादव, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आर पी सिंह, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, उत्तर प्रदेश पिंच्याक सिलॅट एसोसिएशन चेअरमन अनुप गुप्ता व वरिष्ठ उपाध्यक्ष सहजानंद राय, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल तारिक जरगर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना चषक देऊन व विजयी खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्तर प्रदेश पिंच्याक सिलॅट अध्यक्ष टी पी हवेलिया, उत्तर प्रदेश पिंच्याक सिलॅट महासचिव सूरज श्रीवास्तव व उत्तर प्रदेश पिंच्याक सिलॅट कार्यकारी अध्यक्ष जसपाल सिंह यांनी १३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या केले. स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड १९ ते २४ मे या कालावधीत दीव दमन येथे होणाऱ्या खेलो इंडिया बीच गेम्ससाठी करण्यात आली आहे.