
संततधार पावसामुळे गतविजेता केकेआर संघ स्पर्धेतून बाहेर
बंगळुरू : संततधार पावसामुळे गतविजेत्या केकेआर संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. पावसाचा सर्वाधिक फटका केकेआर संघाला बसला आणि गतविजेता संघ स्पर्धेतून आता बाहेर पडला आहे. दुसरीकडे आरसीबी संघ प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ बनला आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे बीसीसीआयने आयपीएल सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा शनिवारी सुरू झाला. परंतु, आरसीबी आणि केकेआर यांच्यातील महत्त्वाचा सामना संततधार पावसात वाहून गेला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. क्रिकेट चाहते विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानात पोहोचले होते. पावसामुळे त्यांची निराशा झाली. बहुतांश क्रिकेट चाहत्यांनी १८ क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे स्टेडियम विराटमय होऊन गेलेले होते.

मुसळधार पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. किमान पाच षटकांचा सामना खेळवण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला आणि केकेआर संघाची प्लेऑफ गाठण्याची शक्यता संपुष्टात आली. या पावसाचा फायदा आरसीबी संघाला झाला. आरसीबी संघाने या सामन्यासह म्हणजे १२ लढतीत १७ गुणांची कमाई केली आहे. गेल्या ११ सामन्यात आरसीबी संघाने आठ सामने जिंकले आहेत. १७ गुणांमुळे आरसीबी संघ टॉप ४ मध्ये पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
केकेआर संघाचे १२ सामन्यांत ५ विजयांसह ११ गुण झालेले आहेत आणि केकेआर संघ सहाव्या स्थानावर ाहे. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे केकेआर आता जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. केकेआर संघासाठी आरसीबी संघाविरुद्धचा सामना करो किंवा मरो असा होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि केकेआर संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला.