
जळगाव ः ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’, असे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक व अनुभूती शाळेचे अध्यक्ष अतुल जैन म्हणाले.
अनुभूती इंग्लिश मीडिअम स्कूल-सेकंडरी शाळेच्या १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? या विषयावर अतुल जैन यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
पुढे बोलताना अतुल जैन पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांने जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची तयारी ठेवावी. शिस्त, सातत्य आणि त्याग यातूनच त्यांना यशस्वी होता येईल. माझे आजोबा हिरालालजी यांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे मेणबत्तीसारखे झिजणारे आपले आयुष्य हवे ते एखाद्या फटाक्यासारखे नसावे की जो एकदा फुटला की तो संपला. असे सांगत अनुभूती स्कूलचे सर्वचे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाल्याने त्यांनी विशेष कौतूक केले. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक वाटचाली विषयी विद्यार्थ्यांना बोलते केले. आपली आवड, अभ्यास व पुढील करिअर निवडीविषयी मनोगत व्यक्त केले. करिअर निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी ११ वी आणि १२वी सायन्स शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अतुल जैन यांनी सांगितले की, इंजिनिअरिंगकडे जायचे असेल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यापेक्षा सरळ पॉलिटेक्निकला डिप्लोमा प्रवेश घेतला तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग व गणित विषयाचा पाया भक्कम होईल यासह एक वर्ष वाचेल. दुसरे कारण असे की इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यास लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.