
प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांची माहिती, सोमवारी पदभार सोडणार
छत्रपती संभाजीनगर ः अवघ्या १९ महिन्यांच्या कार्यकाळात विद्यापीठ क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी राबवणारे प्रभावी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप हे सोमवारी (१९ मे) आपल्या पदाचा पदभार सोडणार आहेत. त्यांच्या जागी पहाडे विधी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांची प्रभारी क्रीडा संचालक म्हणून कुलगुरूंनी नियुक्ती केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागात प्रभारी क्रीडा संचालक म्हणून काम करत असताना डॉ संदीप जगताप यांनी प्रभावी कार्य केले आहे. सोमवारी संदीप जगताप हे प्रभावी क्रीडा संचालक पदाचा पदभार सोडणार आहेत. १९ वर्षांच्या कार्यकाळात संदीप जगताप यांनी अनेक चांगल्या गोष्टी विद्यापीठ क्रीडा क्षेत्रात राबवल्या आहेत.
याविषयी स्पोर्ट्स प्लस दैनिकाशी संवाद साधताना डॉ संदीप जगताप म्हणाले की, १९ महिने मला विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही जबाबदारी पेलताना कुलगुरू यांचे मार्गदर्शन, क्रीडा क्षेत्रातील अनेक अनुभवी मंडळींचा पाठिंबा, प्रोत्साहन या बळावर मला विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या विकासासाठी काही विधायक कार्य करता आले. या कार्यकाळात काही महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. त्याचे चांगले परिणाम आगामी काळात निश्चितच दिसू लागतील असा विश्वास संदीप जगताप यांनी व्यक्त केला.
१९ महिन्यांच्या कार्यकाळात प्रभारी क्रीडा संचालक म्हणून कार्य करताना डॉ संदीप जगताप यांनी अनेक महत्त्वाचे विषय हाताळले आहेत. त्यापैकी एक म्हणजे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये ११ नवीन खेळांचा समावेश केला. तसेच विभागीय पातळीवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्काराची सुरुवात केली. खेळाडूंच्या कल्याणासाठी दैनिक भत्ता तसेच क्रीडा विभागाच्या एकूण अंदाजपत्रकात वाढ केली. २५० खाटांचे स्पोर्ट्स हॉस्टेल मंजूर, बहुउद्देशीय सभागृह, कुस्ती मैदान, स्वतंत्र क्रिकेट मैदानाची जागा निश्चित व मान्यता, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यास मान्यता मिळवली. मराठवाड्यातील पहिल्या १० लेन असलेल्या सिंथेटिस ट्रॅकच्या कामाचा साक्षीदार, अशा अनेक चांगल्या गोष्टींची पूर्तता संदीप जगताप यांनी केलेली आहे.
१९ महिन्याच्या प्रवासात मी प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. माझे उद्दिष्ट नेहमीच खेळाडू आणि विद्यापीठाच्या हितासाठी कार्य करणे हेच होते. हे कार्य करताना अनेकांचा पाठिंबा, प्रोत्साहन लाभल्यामुळे मी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवू शकलो याचे विशेष समाधान असल्याचे डॉ संदीप जगताप यांनी सांगितले.