
मायरा शेख एकेरीत अजिंक्य, दुहेरीत बंगाले बहिणींना विजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः चौदा वर्षांखालील वूड्रिज एमएसएलटीए रॅकिंग चॅम्पियनशिप सिरीज स्पर्धेत पुण्याच्या आदिराज दुधाने याने एकेरी व दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलींच्या गटात मुंबईच्या मायरा शेख हिने अजिंक्यपद मिळवले. दुहेरीत मीरा बंगाले व रेहा बंगाले या जुळ्या बहिणींनी जेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या आदिराज दुधाने याने छत्रपती संभाजीनगरच्या विश्वास चंद्रशेखरन याचा अंतिम सामन्यात पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात मुंबईच्या मायरा शेख हिने पुण्याच्या जान्हवी सावंत हिचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. दुहेरीत मुलींच्या गटात मीरा बंगाले आणि रेहा बंगाले या जुळ्या बहिणींनी मायरा शेख आणि जान्हवी सावंत यांचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
ही स्पर्धा वूड्रिज शाळेच्या टेनिस कोर्टवर घेण्यात आली. या स्पर्धेच्या विजेत्या टेनिस खेळाडूंना डॉ प्रताप चौहान, केतन वाकणकर आणि समीर मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी वूड्रिज शाळेचे अध्यक्ष दीपक कोठारी, स्पर्धा आयोजक विशाल औटे, शशिकुमार सावंत आणि स्पर्धेचे सुपरयाझर प्रवीण गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
अंतिम सामना ः आदिराज दुधाने (पुणे) विजयी विरुद्ध विश्वास चंद्रशेखरन (छत्रपती संभाजीनगर) (२-६, ६-२, ६-२).
उपांत्य फेरी निकाल ः आदिराज दुधाने (पुणे) विजयी विरुद्ध पूर्णजय कुटवाल (नागपूर) (६-२, ६-१), विश्वास चंद्रशेखरन (छत्रपती संभाजीनगर) विजयी विरुद्ध लव परदेशी (पुणे) (६-२, ६-१)
अंतिम सामना मुली एकेरी ः मायरा शेख (मुंबई) विजयी विरुद्ध जान्हवी सावंत (पुणे) (१-६, ७-५, ६-१).
उपांत्य फेरी मुली एकेरी ः मायरा शेख (मुंबई) विजयी विरुद्ध मीरा बंगाले (पुणे) (६-४, ६-३), जान्हवी सावंत (पुणे) विजयी विरुद्ध रेहा बंगाले (पुणे) (६-४, ६-३).
दुहेरी अंतिम फेरी मुले ः आदिराज दुधाने आणि आरव बेले (पुणे) विजयी विरुद्ध अर्चन पाठक (नाशिक) आणि आहान जैन (पुणे) (७-५, ६-४).
दुहेरी अंतिम फेरी मुली ः मीरा बंगाले आणि रेहा बंगाले (पुणे) विजयी विरुद्ध मायरा
शेख आणि जान्हवी सावंत (पुणे) (३-६, ६-२, १०-३).