
अखिल भारतीय चेस मास्टर्स फिडे बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई : कर्नाटकची २० वर्षीय अवनी आचार्य उडुपी हिने अखिल भारतीय चेस मास्टर्स मुंबई फिडे रेटेड क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
आठ राऊंडनंतर अवनी हिच्यासह महाराष्ट्राच्या मयुरेश पारकरचे प्रत्येकी ७ गुणांची कमाई केली. मात्र, सरस टाय-ब्रेकर स्कोअरच्या आधारे अवनी हिने बाजी मारली. तिने ३० हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. उपविजेता मयुरेशला २० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
१६६९ रेटिंग गुण असलेले अवनीला मयुरेश पारकरच्या १७५७ रेटिंगपेक्षा जास्त टाय-ब्रेकर स्कोअरच्या आधारे विजेता घोषित करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अजिंक्य पिंगळे यांनी नमूद केले की, अवनीने ३६.५ गुणांसह टाय-ब्रेक स्कोअर पूर्ण केला तर पारकरचा टाय-ब्रेक स्कोअर इतका ३२ होता. आठ फेऱ्यांपर्यंत चाललेल्या स्पर्धेत अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. त्यात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले.
अवनी हिने तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध कमालीचे सातत्य राखले. शेवटच्या आणि आठव्या फेरीत आपल्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या दर्श शेट्टीवर (इलो १८३३) तिने विजय मिळवला. स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू १० वर्षीय पर्व एच हकानी हा ६.५ गुणांसह आठव्या स्थानी राहिला. यंदाच्या स्पर्धेत कमालीची चुरस पाहायला मिळाली. ६ खेळाडूंनी प्रत्येकी ६.५ गुणांसह संयुक्तरित्या तिसरे स्थान मिळवले. यावरून त्याचा अंदाज येतो.
अंतिम निकाल (आठवी आणि अंतिम फेरी)
मयुरेश पारकर विजयी विरुद्ध यश कापडी, दर्श शेट्टी पराभूत विरुद्ध अवनी आचार्य उडुपी, रेयांश वेंकट बरोबरी विरुद्ध ओम गडा, दक्ष जागेसिया बरोबरी विरुद्ध पर्व हकानी, कुश अग्रवाल विजयी विरुद्ध ध्रुव मुठे, वागिश स्वामीनाथन विजयी विरुद्ध आर्या बागायतदार, यती अग्रवाल बरोबरी विरुद्ध दीपक सोनी, श्रवणा अग्रवाल बरोबरी विरुद्ध क्रिश बुटाला, अंबर गंगवाल पराभूत विरुद्ध जान्हवी सोनेजी, आराध्या केंजळे पराभूत विरुद्ध श्रेयस कौशिक.