
कोल्हापूर ः महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना संधी मिळत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी येथे केले.
कोल्हापूर येथील बसंत हॉल, सयाजी हॉटेल येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जून महिन्यात एमपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत पहिल्या हंगामातील उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघाचाही समावेश आहे. या लीगमधील संघ मालकांची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघमालकांची भूमिका, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
एमसीए अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अनेक नवीन सुविधांचा विकास करुन महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव मदन शेळके, सहसचिव संजय पठारे, खजिनदार शीतल भोसले, माजी अध्यक्ष डॉ बाळ पाटणकर, कोल्हापूर टस्कर्स संघाचे मेंटर अक्षय दरेकर, उपकर्णधार श्रीकांत मुंडे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
एमसीए अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱयात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱया वर्षी खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल या केवळ स्पर्धात्मक मंच नसून एक परिवार आहे. सर्व संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम, सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी कोल्हापूर क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत. या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील असा विश्वास एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे भविष्यात विभागीय अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचे एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे आयपीएल स्पर्धेमुळे देशातील अनेक ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांची दारे खुली झाली. कोल्हापूर मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याप्रमाणे एमपीएल स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्यासाठी भविष्यात अनेक संधी निर्माण होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल झालेले दिसतील असा विश्वास युवराज संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.