
ऋषभ पंतचे अपयश कायम, लखनौचा आठवा पराभव
लखनौ : अभिषेक शर्माच्या (५९) वादळी फलंदाजीनंतर इशान किशन (३५), हेनरिक क्लासेन (४७) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा सहा विकेट राखून पराभव केला.
सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान होते. हैदराबाद संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे हा ९ चेंडूत १३ धावा काढून बाद झाला. त्याने तीन खणखणीत चौकार मारले. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. अभिषेक शर्मा व इशान किशन या आक्रमक फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. दिग्वेश राठी याने अभिषेक शर्माची वादळी खेळी ५९ धावांवर संपुष्टात आणली. अभिषेकने अवघ्या २० चेंडूत ५९ धावा फटकावल्या. या आक्रमक अर्धशतकी खेळीत अभिषेक याने सहा टोलेजंग षटकार व चार चौकार ठोकले.

इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्यात ३९ धावांची वेगवान भागीदारी झाली. इशान २८ चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. त्याने दोन षटकार व तीन चौकार मारले. क्लासेन व कामिंदू मेंडिस यांची ५५ धावांची भागीदारी लखनौ संघाचा पराभव निश्चित करणारी ठरली. क्लासेन ४७ धावांवर बाद झाला. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. शार्दुलने त्याची विकेट घेतली. मेंडिस ३२ धावांवर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. त्यानंतर अनिकेत वर्मा (नाबाद ६) व नितीश कुमार रेड्डी (नाबाद ५ ) यांच्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादने १९व्या षटकात चार बाद २०६ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. दिग्वेश राठी याने ३७ धावांत दोन गडी बाद केले. विल ओ’रोर्क याने ३१ धावांत एक बळी मिळवला. शार्दुल ठाकूरने ३९ धावांत एक गडी बाद केला.
सलामी जोडीची शतकी भागीदारी
सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद २०५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात मिचेल मार्श आणि एडन मार्कराम या सलामी जोडीचा मोलाचा वाटा राहिला. मिचेल मार्श व एडन मार्कराम या जोडीने १०.३ षटकात ११५ धावांची भागीदारी करुन संघाला एक आक्रमक सुरुवात करुन दिली.

मार्श व मार्कराम यांच्या धमाकेदार शतकी भागीदारीने लखनौ संघ भक्कम स्थितीत पोहोचला. दुबे याने मार्श याला ६५ धावांवर बाद केले व पहिला बळी मिळवून दिला. मार्श याने ३९ चेंडूत ६५ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत चार टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. एडेन मार्कराम याने अवघ्या ३८ चेंडूत ६१ धावा काढल्या. त्याने चार चौकार व चार उत्तुंग षटकार ठोकले.
कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंत केवळ ७ धावांवर बाद झाला. पंत या सामन्यात फक्त सहा चेंडूंचा सामना करू शकला. यात त्याला केवळ एक चौकार मारता आला. निकोलस पूरन याने २६ चेंडूत ४५ धावांची दमदार खेळी केली. पूरन याने सहा चौकार व एक षटकार मारला.
आयुष बदोनी (३), अब्दुल समद (३), शार्दुल ठाकूर (४) हे आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. लखनौ संघाने २० षटकात सात बाद २०५ धावा काढल्या. इशान मलिंगा याने २८ धावांत दोन गडी बाद केले. हर्ष दुबे (१-४४), हर्षल राणा (१-४९), नितीश कुमार रेड्डी (१-२८) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.