
सर्वात कमी चेंडूत मिळवले १५० विकेट
लखनौ ः लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध एक विकेट घेऊन सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने आयपीएल स्पर्धेतील नंबर वन गोलंदाज बनला आहे. हर्षल पटेल याने सर्वात कमी चेंडूत १५० बळींचा टप्पा गाठला आहे. असा पराक्रम करुन त्याने ऐतिहासिक विक्रम रचला आहे.
हर्षल पटेलने या सामन्यात चार षटकांत ४९ धावा देत एक विकेट घेतली. यासह त्याने आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण केले. हर्षल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत १५० बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने आयपीएलमधील सर्व गोलंदाजांना मागे टाकून एक ऐतिहासिक विक्रम रचला आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हर्षलने आयपीएलमध्ये २३८१ चेंडूत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर होता. त्याने आयपीएलमध्ये २४४४ चेंडूत १५० विकेट्स पूर्ण केल्या.
हर्षल पटेल २०१२ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. आतापर्यंत त्याने ११७ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण १५० विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, त्याची सर्वोत्तम कामगिरी २७ धावांत ५ बळी घेणे ही आहे.
बुमराह-भुवनेश्वर यांचा यादीत समावेश
हर्षल पटेल आयपीएलमध्ये १५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. त्याच्या आधी भुवनेश्वर कुमार (१९३ बळी) आणि जसप्रीत बुमराह (१७८ बळी) यांनी अशी कामगिरी केली आहे. भुवनेश्वर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत १५० बळी घेणारे गोलंदाज
हर्षल पटेल – २३८१ चेंडू
लसिथ मलिंगा – २४४४ चेंडू
युजवेंद्र चहल – २५४३ चेंडू
ड्वेन ब्राव्हो – २६५६ चेंडू
जसप्रीत बुमराह – २८३२ चेंडू