
राज्य तायक्वांदो स्पर्धा ः सृष्टी, अद्वैत, प्रथमेश, अवनी, श्रावणीची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने नाशिक येथे झालेल्या राज्य कॅडेट आणि ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २ सुवर्ण आणि २ कांस्य पदके पटकावली.

या स्पर्धेत सृष्टी वावधाणे हिने ४६ किलो वजन गटात शानदार कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तिने अमरावती, अहिल्यानगर ग्रामीण आणि अहिल्यानगर शहर येथील स्पर्धकांवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत मुंबई शहरच्या खेळाडूला निर्णायक पराभूत केले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची २९ मे ते २ जून २०२५ दरम्यान देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवत अद्वैत परपाळे याने ६१ किलो कॅडेट गटात सुवर्णपदक पटकावले. त्याने मुंबई शहर आणि पुणे येथील खेळाडूंना हरवून अंतिम सामन्यात सांगली शहरच्या खेळाडूला मात दिली. अद्वैतची देखील आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रथमेश गोरे याने ज्युनियर मुलांच्या ६३ किलो वजन गटात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्याने पहिल्या लढतीत ठाण्याच्या खेळाडूला, दुसऱ्या लढतीत मुंबईच्या खेळाडूला पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याचा पुण्यातील खेळाडूकडून पराभव झाला.


मान्यताप्राप्त सांघिक पूमसे प्रकारात अवनी कुलकर्णी, श्रावणी कुलकर्णी आणि सृष्टी वावधाणे या त्रिकुटाने उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि अचूकता दर्शवत कांस्यपदक जिंकले.

या सर्व सहभागी खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षक संकेत व्यवहारे, संतोष बसनेत, सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा प्रा प्रतिभा सानप आणि सचिव डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने सर्व विजेत्यांचे आणि सहभागी खेळाडूंचे त्यांच्या समर्पण आणि यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
तामचे अध्यक्ष संदीप ओंबासे, राज्य महासचिव गफार पठाण, खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी या विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे राजेश सातोनकर, विजय सिंगारे, नारायण भालेराव, हृषिकेश आपोनारायण, डॉ विक्रम चौबे, नयन तिवारी, संकेत कुलकर्णी, रुपेश शिंदे, संकेत व्यवहारे, मोहित देशपांडे, संतोष बसनेत, कुणाल राठोड, प्रबिन विश्वकर्मा, अजिंक्य देवरे, अरुण गाडेकर, सुनील बसनेत, दीपक भोईर आणि सुरेश जाधव यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.