महाराष्ट्राच्या वैभवशाली क्रीडा इतिहासात क्रीडा पत्रकारांसाठी मानाचे पान – धनराज पिल्ले

  • By admin
  • May 20, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई ः महाराष्ट्रातील क्रीडा वैभावाची गाथा लिहायची असेल तर त्यात क्रीडा पत्रकारांनाही मानाचे पान असले पाहिजे. उद्या जर याची डॉक्युमेंटरी करायची झालीच तर आम्हा खेळाडूंना या पत्रकारांबद्दल बोलायला सांगा. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा क्रीडा पत्रकार हा अविभाज्य भाग आहे अशा शब्दात पद्मश्री हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार प्राप्त विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर धनराज पिल्ले यांचे नाव आज जे गाजतेय त्याची मुहुर्तमेढ महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारांनी घातली. १८ वर्षांच्या माझ्या सारख्या युवा हॉकीपटूतील गुण हेरून वर्तमानपत्रात त्याची हेडलाईन बनविणारे हे सगळे माझे पत्रकार मित्रच होते. माझी आई आजही वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे जपून ठेवते. तुमचे हे प्रेम मी कसे विसरू शकतो असेही धनराज पिल्ले यावेळी म्हणाला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पत्रकार पुरस्कार सोहळ्यावेळी धनराज पिल्ले हे बोलत होते. माझ्या विजयाची एक पत्रकार परिषद स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर घेतली होती. यावेळी दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रात जे आलेली हेडलाईन “धनराज पिल्ले यांना ४८ तासात मुंबईत घर” होती ती खूप मला भावली. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघातर्फे कै आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार तुषार वैती (२०२१), प्रसाद लाड (२०२२), जयेंद्र लोंढे (२०२३), रोहित नाईक (२०२४) यांना प्रदान करण्यात आला. ७ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांसाठी  कै महेश बोभाटे क्रीडा पत्रकार पुरस्कार द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर देण्यात आला होता. २०२० सालचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव सनील याने स्वीकारला. तर शरद कद्रेकर (२०२१), संजय परब (२०२२), विजय साळवी (२०२३), सुभाष हरचेकर (२०२४) यांना महेश बोबाटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी कै आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी आर्थिक सहाय्य करणारे आत्माराम मोरे यांचे चिंरजिव अश्विनी कुमार आणि कै महेश बोबाटे पुरस्कारासाठी मदत करणारे त्यांचे चिरंजिव प्रथमेश बोबाटे यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेते संजय परब यांनी त्यांना मिळालेला दहा हजाराचा धनादेश प्रभाकर नारकर यांच्या कोकण नविकास समिती या संस्थेला दिला. तर क्रीडा पत्रकारांसाठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन अभ्यासक्रम सुरु केला तर मी त्यात योगदान द्यायला तयार आहे असे विजय साळवी यांनी नमुद केले.

सोहळ्याचे अतिथी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्ही खेळ खेळत होतो मात्र बातमीतून लिखाणातून हे पत्रकार आमच्या मनातले लिहित होते ही खूप मोठी गोष्ट आहे.खेळाडू घडविण्यात मराठी क्रीडा पत्रकारांचे योगदान मोठे होते.

महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया कबड्डीपटू विजू पेणकर म्हणाले की ,ज्या माणसाचा मी चाहता आहे त्याच्या मांडीला मांडी लावून हा सोहळा पाहतोय खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यावर अन्याय झाला खरा मात्र त्याने जगाला दाखवले की अन्याय सहन करणारा किती मोठा होऊ शकतो. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्याने जे टीम वर्क करुन जो विजय मिळवला आहे त्याला तोड नाही. पत्रकार संघाला चांगला कॅप्टन मिळाला आहे असे ते म्हणाले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, माझ्या ३० वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेतील सर्व आठवणी आज जाग्या झाल्या. आजचा हा सोहळा म्हणजे क्रीडा क्षेत्रातील गेट टुगेदर म्हणावे लागेल, सोहळ्यास आलेले काहीजण १० ते १५ वर्षांनंतर भेटत आहेत. कोरोनानंतर दोन-तीन वर्षे घडी बसायला वेळ लागला असल्याने पुरस्कार देण्यास विलंब झाला. धनराज पिल्ले यांचे कर्तृत्व भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. धनराज यांनी त्याच्या संघसहकाऱ्यांसाठी विमानतळावर हॉकी खेळाडूंसाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळेच आज क्रिकेट सोडून इतर खेळातील खेळाडूंनाही विमानाने पाठविले जाते. यंदा खेलो इंडियासाठी महाराष्ट्राच्या ५६५ खेळाडूंचे पथक बिहारला विमानाने पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते याचे श्रेय धनराजचेच असल्याचे चव्हाण म्हणाले.

संघाचे कार्यवाह व पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविक केले, पुरस्कार समिती उपाध्यक्ष व संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री उदय देशपांडे, रोहित शर्माचे कोच पद्मश्री दिनेश लाड, अनेक क्रीडा संघटक, पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, सुरेश वडवलकर, प्रा हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. सोहळ्याचे निवेदन अश्विन बापट यांनी केले. स्वाती घोसाळकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *