
पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ग्रेस गुणांपासून वंचित राहिलेल्या शालेय खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शरदचंद्र धारुरकर यांनी म्हटले आहे की, राज्यात इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. शासनाने शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या तरतुदीनुसार ग्रेस गुण दिले जातात. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे बोर्डाकडून काही खेळाडूंना ग्रेस गुण देण्यात आलेले नाहीत. सदर गुणांसाठी शालेय स्तरावरुन सादर केलेल्या प्रस्तावाच्यावेळी ऑनलाइन प्रक्रियेत काही अडचणी आल्या. या सर्व अडचणींवर मात करुन सदरचे प्रस्ताव दिलेल्या वेळेत बोर्डाकडे सादर केले असताना देखील राज्यातील काही खेळाडूंना ग्रेस गुण मिळालेला नाहीत.
अशा ग्रेस गुणांपासून वंचित राहिलेल्या खेळाडूंचे प्रमाण कमी आहे. तरी पण त्यांच्यावर झालेला हा अन्याय लक्षणीय आहे. सदर ऑनलाईन प्रक्रियेत प्रस्ताव सादर केल्यानंतर मान्य हा मेसेज येऊन देखील या खेळाडूंना ग्रेस गुणांचा लाभ झालेला नाही. तसेच ऑनलाईन प्रक्रियेतील काही तांत्रिक अडचणींमुळे काही खेळाडू ग्रेस गुणांच्या सवलतीला वंचित राहिले आहेत. ग्रेस गुणांपासून वंचित या सर्व शालेय खेळाडूंना ग्रेस गुण दिले जावेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, कार्याध्यक्ष अनिल आदमाने, उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, सचिव चांगदेव पिंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.